माजलगाव : अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीला माजलगाव सत्र न्यायालयाने आजीवन कारावास तसेच 26 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. अप्पर सत्र न्या. संतोष देशमुख यांनी हा निकाल दिला आहे.
माजलगाव तालुक्यातील साडेआठ वर्षांची मुलगी 13 जुलै 2021 रोजी खेळण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. तिच्या मैत्रिणीच्या काकाने पुतणीला कामानिमीत्ताने बाहेर पाठवून दिल्यानंतर पिडित मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. साडेआठ वर्षाच्या पीडितेने घरी आल्यावर तिच्या आईला हा प्रकार कथन केला. माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला आरोपी पुरुषोत्तम घाटूळ याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती.
पोलिस उपअधीक्षक सुरेश पाटील व स.पो.नि.नीता गायकवाड यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अप्पर सत्र न्या.देशमुख यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. सर्व साक्षी, पुरावे,जवाब, वैद्यकीय तपासणी अहवाल यांच्या आधारे आरोपीस आजीवन कारावासासह 26 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघिरकर सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला.