शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी डॉक्टरांविरुध्द केलेल्या वक्तव्याचा सुमारे पन्नास हजार डॉक्टरांकडून इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, मानद सचिव डॉ. मंगेश पाटे यांच्या सहीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. सरकरने या प्रकरणी तातडीने योग्य ती दखल घेऊन अशा प्रवृत्तीला आळा घालावा तसेच योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
आयएमएच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की संभाजी भिडे यांचे डॉक्टरांविषयी लोकांना उद्देशून केलेले भाष्य अतिशय खालच्या पातळीवरील असून ते लोकांना डॉक्टरांबद्दल भडकवण्याचे काम करत आहेत. राजकीय, सामाजिक पटलावरील व्यक्तींनी अशाप्रकारे निखालस खोटी आणि मनमुराद स्वरुपाची अशास्त्रीय विधान करणे तसेच लोकांचे विचार हिंसात्मक प्रवृत्तीकडे वळवणे हा प्रकार एकुणच निंदनीय असल्याचे पत्रात पुढे म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या कालावधीत अतिशय धोकादायक परिस्थितीत डॉक्टरांनी लोकांवर वेळोवेळी उपचार करण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. संपूर्ण जग सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉकडाऊन काळात आपआपल्या घरात होते. अशा परिस्थितीत डॉक्टर्स चोवीस तास अहोरात्र आपली सेवा बजावत होते. डॉक्टरांच्या त्यागाला दुर्लक्षित करुन अथवा त्यांना विसरून ‘त्यांना मारले पाहिजे किंवा कोरोना हे थोतांड असल्याचे’ अत्यंत आक्षेपार्ह आणि विक्षिप्त वक्तव्य भिडे यांनी केले असून ते चिथावणीखोर आहे. कोरोना संबंधी चुकीची माहिती पसरवणे तसेच चिथावणीखोर विधान जनतेसमोर करणे ही एक अक्षम्य चुक असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
वयाचा मान ठेऊन वडीलधारी मंडळींचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. मात्र संभाजी भिडे यांनी केलेले भाष्य अतिश्य हीन व घृणास्पद असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करत असल्याचे पत्रात पुढे म्हटले आहे. संभाजी भिडे यांनी आपले विधान मागे घेऊन जाहीर माफी मागावी असे पुढे म्हटले आहे. भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आयएमएच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.