सोलापूर : सोलापूर येथील शहर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त पौर्णीमा चौगुले यांनी दोघा पत्रकारांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. श्रीराम मोडक यांनी रद्दबातल केला आहे. बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या तत्कालीन उपायुक्त पौर्णीमा चौगुले यांनी सदर बझार पोलिस स्टेशनला 1 जून 2018 रोजी फिर्याद दाखल केली होती. सोलापूर येथील एका एका दैनिकाचे पत्रकार अमोल व्यवहारे आणि आवृत्तीचे कार्यकारी संपादक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
8 ऑक्टोबर 2017 आणि 22 मे 2018 असे दोन दिवस वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत पोलिस उपायुक्त पौर्णीमा चौगुले यांनी भा.द.वि. 505(2), 500,1, 2 या कलमानुसार गुन्हा नोंदवला होता. पोलिस अधिका-यांकडून दाखल करण्यात आलेला गुन्हाच बेकायदा असून तो कायद्याच्या चुकीच्या तरतुदीनुसार दाखल करण्यात आला आहे. असा कोणताही खटला कायद्यानुसार चालू शकणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अॅड. अन्विल कालेकर यांनी पत्रकारांची बाजू मांडतांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पत्रकार बिलाल काळू व पत्रकार आमिश देवगण यांच्या निवाड्याचा आधार घेतला. हे निवाडे न्यायालयात सादर करण्यात आले. फिर्यादींच्या वतीने सरकारी वकील अॅड. जयेश याग्रीक यांनी तर पत्रकार व्यवहारे यांच्या वतीने अॅड. अन्विल कालेकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.