भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुय्यम पद स्विकारले हे त्यांचा चेहराच सांगत होता. मात्र संघाचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे त्यांनी ते पद नाकारले नाही. मात्र ते नाखुश असल्याचे वक्तव्य रा.कॉ. सुप्रिमो शरद पवार यांनी केले आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रसार माध्यमांसोबत वार्तालाप केला. यावेळी शरद पवार बोलत होते.
एकनाथ शिंदे गटाने पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे आपणास वाटले होते मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले हा आपल्यासाठी देखील एक अनपेक्षीत धक्का असल्याचे शरद पवार म्हणाले. पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर काम केल्यानंतर त्यांना उप मुख्यमंत्रीपदावर बसवणे हे धक्कादायक असून याची कल्पना कदाचित एकनाथ शिंदे यांना देखील नसावी असे देखील बोलतांना शरद पवार म्हणाले. जे पद मिळाले ते घ्यावे असे उदाहरण फडणवीसांनी दाखवून दिले आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर त्यांनी नकार देणे हे शक्य नाही आणि ते खरेच ठरले.