“नदीचं पुसू नये मुळ आणि ऋषीचं पुसू नये कूळ” अस म्हणतात. तस का म्हणतात? माहित नाही. त्याचे अनेक अर्थ – अन्वयार्थ असावेत. आपण सामान्य माणसं. ढोबळ मानाने दादा कोंडकेंच्या निरागस मनानं विचार करावा हेच बरं. नदी कडे लक्ष दिलं तर विशाल सागर दिसतो. पण तिचे उगमस्थान एखाद्या दगडात “झरा” निर्मळ जल दौडवत निघावा तसं दिसत. तसंच महाराष्ट्रातल्या आजच्या काही बड्या राजकिय व्यक्तींबद्दल म्हणता येईल.
आता पहिलं नाव आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं. कधीकाळी हा 16 ते 22 वयोगटातल्या मुलगा ठाण्यात रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट बघत होता असं कोणाला सांगितलं तर खरं वाटेल? नाही ना. पण ही खरी गोष्ट आहे. सन 1987 साली ठाण्यात आपल्या रिक्षासह उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांचं हे तत्कालीन छायाचित्र काही चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलंय. कोणत्याही कष्टाचं काम प्रामाणिकपणे करण्याची हिंमत ठेवणारी साधी माणसं पुढे जीवनात कशी उंच झेप घेतात त्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातले काही रिक्षाचालक हेच राजकारणाचाही गाडा यशस्वीपणे हाकतात. प्रशासकीय यंत्रणेसह सत्ताचक्रही चालवताहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी बालवयात पिताश्रींसोबत रेल्वे स्टेशनवर “चहावाला” ही भूमिका निभावली होती. आता भारतभर चहा आणि चहावाले यांच्यावर लोक भरभरु प्रेम करतात.
महाराष्ट्रातले दुसरं मोठं नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे. गरिबीला न लाजणारा कष्टाळू माणूस. हे शिंदे कधीकाळी कोर्टात प्यून (शिपाई) होते. कोर्टात तारखेवर आलेली अशील – वकील यांच्या नावाचा “हाजीर हो” असा खणखणीत आवाजात पुकारा त्यांनी केलाय. नंतर पुढे पोलीस इन्स्पेक्टर ते राज्याचे मुख्यमंत्री – देशाचे गृहमंत्री – ऊर्जामंत्रीपदही त्यांनी भूषवलं. एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही ते कधी संतापल्याचे – गर्वाची बाधा झाल्याचे चित्र कधीच महाराष्ट्राला, देशाला दिसलं नाही.
अविनाश भोसले. कधीकाळचा हा तरुण पुण्यातला रिक्षाचालक. आयुष्याची सुरुवात त्यानेही अशीच कष्टांने केल्याचे सांगतात. त्यांच्या वागण्यात प्रामाणिकपणा ठासून भरलेला. याच प्रामाणिकपणाच्या जोरावर हा गडी राजकारण्यांच्या गळ्यातला ताईत बनला. राज्यात जशी शिवसेना ओळखली जाते तशी राज्यात आयएएस अधिकारी सदस्य असलेली “अविनाश सेना” “अॅक्टिव्ह” असल्याचं बोललं जातं. अविनाश भोसले यांचा कर्तृत्व एवढं की अत्यंत उच्च दर्जाच्या विविध महागड्या मोटार गाड्यांचे निर्माते. अविनाशजींच्या कारच्या प्रथमदर्शनी भागात A-B असे इंग्रजी आद्याक्षरे नोंदवतात. त्यांच्या कारच्या नंबर पेक्षा ही अक्षरे दिसताक्षणी त्यांना सन्मानपूर्वक वाट मोकळी करुन दिली जाते.
तिसरं नाव प्रतापराव सरनाईक. हेही राजकीय बडे प्रस्थ. कधीकाळी हे हि रिक्षा चालवत. ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्याने ते जास्त प्रकाशझोतात आले. कोट्याधीश बनलेली माणसं लक्षणीय ठरतात. परंतु अत्यंत साध्या रिक्षाचालकाचा छोटासा कष्टाचा कामधंदा करुन जीवनाची वाटचाल करणारी एकनाथ शिंदे यांच्यासारखी मोठ्या पदावर जाऊनही पाय जमिनीवर असल्याचे दाखवणारी माणसं पाहिली म्हणजे कष्टाच्या दिव्यत्वाची प्रचिती येते आणि आपोआप कर जुळतात. कालाय तस्मै नमः