उस्मानाबाद : बस प्रवासासाठी प्रवाशाने दिलेले दहा रुपयांचे नाणे नाकारण्यासह अपमानास्पद वागणूक देणा-या कंडक्टरला उस्मानबााद ग्राहक आयोगाने आठ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. बी. वाय. काकडे असे दंड सुनावण्यात आलेल्या बार्शी डेपोच्या एसटी कंडक्टरचे नाव आहे. दहा रुपयांचे नाणे नाकारणा-यांना या निकालामुळे जणू चपराक बसली आहे.
उस्मानाबादचे अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद हे 22 मे 2019 रोजी सायंकाळी बार्शी डेपोच्या बसने वैराग ते उस्मानाबाद प्रवास करण्यासाठी एमएच 20 डी 8169 या क्रमांकाच्या बसमधे चढले होते. प्रवासी असलेल्या अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी अपंगत्वाचे ओळखपत्र दाखवून दहा रुपयांचे एक व पाच रुपयांचे एक अशी दोन नाणी कंडक्टर काकडे यांना दिले. मात्र त्यातील दहा रुपयांचे नाणे कंडक्टर बी. वाय. काकडे यांनी घेण्यास नकार दिला.
याबाबत अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी उस्मानाबाद ग्राहक आयोगासह बार्शी डेपोकडे सदर कंडक्टरची तक्रार दाखल केली. अर्जदाराच्या वतीने अॅड.महेंद्र एम. सोनवणे यांनी युक्तीवाद केला. तो युक्तीवाद ग्राह्य धरुन ग्राहक आयोगाने आदेश पारित करत कंडक्टरविरुध्द निकाल दिला. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी तसेच अर्जाच्या खर्चापोटी आठ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.