महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. आज झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या वकिलांकडून बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचे वेळोवेळी सांगण्यात आले. आपण शिवसेनेतच असून सदस्यत्व सोडले नसल्याचे शिंदे गटाने दावा केला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे आज सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी शिंदे गटाचे वकील अॅड. हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केले.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना कोणाची हे ठरविण्यासाठी पुरावे दाखल करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 8 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीची विनंती सरन्यायाधीशांना गेल्या आठवडय़ात करण्यात आली होती. ही याचिकाही अन्य याचिकांबरोबर सुनावणीसाठी घेण्यात आली होती.