पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

संगमनेर : दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने गर्भपात करण्यास सांगितले असता नकार दिल्याने पती बाळासाहेब पिलगर याने पत्नी वर्षाचा गळा दाबून व वीजेचा शाॅक देत खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

भाऊसाहेब संभाजी कदम (पाथरे बुद्रुक, ता. राहाता) यांची मुलगी वर्षा बाळासाहेब पिलगर (२७) हिला संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे दिले होते. ती दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने पती बाळासाहेब भिकाजी पिलगर, सासू लिलाबाई पिलगर, दीर सुरेश पिलगर यांचा विरोध होता. वर्षाने गर्भपात करावा, यासाठी या तिघांनी तिच्यावर दबाव आणला. तिने विरोध केल्याने तिघांनी ३० जुलै २०२० रोजी घरात वर्षाचे उशीने तोंड दाबून विजेचा शॉक देऊन खून केला. भाऊसाहेब कदम यांच्या फिर्यादी वरून आश्वी पोलिसांनी वतर, सासू व दीरावर खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक योगेश कामाले यांच्याकडे होता. त्यांनी व हवालदार तात्याराव वाघमारे यांनी पुरावे गोळा केले. १२ साक्षीदार तपासले. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी युक्तिवाद केला. प्रवरा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व उपनिरीक्षक योगेश कामाले यांची साक्ष महत्वाची ठरली. न्या. मनाठकर यांनी बाळासाहेब याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here