अकोला एलसीबीच्या त्या पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अकोला : शेगाव येथील सराफा व्यावसायिकाला चोरीचे सोने खरेदी केल्या प्रकरणात अटक केल्यानंतर एलसीबीच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी सातवे तदर्थ न्यायदंडाधिकारी एस. जे. बोंद्रे यांच्या न्यायालयात 13 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. तक्रारकर्त्याची याचिका मान्य करत एलसीबीच्या त्या पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत.

शेगाव येथील सराफा व्यवसायी श्याम धनराज वर्मा (40) हे शेगाव येथील सराफ व्यावसायिक आहेत. 9 जानेवारी रोजी अकोला एलसीबी कर्मचा-यांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून मध्यरात्री अडीच वाजता सोने खरेदी केल्याच्या एका प्रकरणात ताब्यात घेतले होते. गाडीत टाकून श्याम वर्मा यांना अकोला येथे आणले जात असतांना पोलीस कर्मचारी त्यांच्या तोंडावर थुंकले व त्यांना मारहाण केली असा वर्मा यांचा आरोप आहे. एलसीबी कार्यालयात आणून पोलीसांनी त्यांना नग्न करुन त्यांचे हातपाय दोरीने बांधून पायांवर जबर मारहाण केल्याचा देखील वर्मा यांचा आरोप आहे. वर्मा यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारकेल्याचा देखील आरोप वर्मा यांनी केला असून या घटनेत सुजलेल्या पायांवर उकळते पाणी टाकण्यात आल्याचे वर्मा यांनी म्हटले होते. न्यायालयास काही सांगितल्यास जीवे मारण्यासह 30 ते 35 गुन्हे दाखल करु अशी धमकी दिल्याचा आरोप देखील तक्रारदार श्याम वर्मा यांनी केली होती.

जामीन मिळाल्यानंतर वर्मा यांनी 18 जानेवारी रोजी याप्रकरणी पोलिस अधिक्षकांकडे व त्यानंतर डीआयजी चंद्रकिशोर मीना यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सहा पोलिस कर्मचारी निलंबीत झाले. तक्रारदार श्याम वर्मा यांनी सीआरपीसी 156 (3) नुसार पोलिसांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. सातवे तदर्थ न्यायदंडाधिकारी एस.जे. बोंद्रे यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सिटी कोतवाली पोलिसांना आदेश दिले आहेत. तक्रारदार वर्मा यांच्या बाजून अ‍ॅड. रितेश डी. वर्मा यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here