महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडल्यापासून राज्यभर 50 खोक्यांचं चक्रीवादळ घोंघावतयं. आता हे 50 खोक्यांच नॅरेटीव्ह ग्रामीण भागात गल्लीबोळात जाऊन पोहोचल. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे गटातील बहुतेक सर्व आमदार आणि मंत्रीदेखील अस्वस्थ आहेत. अमरावतीचे आ. रवी राणा यांनी तर या बंडखोरांनी 50 खोके म्हणजे पैसे घेतले असतील त्यासाठीच ते गुवाहाटीतगेले असं जाहीरपणे फाडून खाल्याने माजी मंत्री बच्चू कडू जाम भडकले आहेत. ठाकरे राजवटीत राज्यमंत्री असलेल्या या बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळाले नाही. शिवाय तोंड बंद ठेवून गप्प बसून राहण्याची पाळी आल्याने त्यांचा संतापाचा पारा वाढलाय. आमच्यावर आरोप करणा-या रवी राणा यांनी 1 नोव्हेंबर पर्यंत 50 खोके म्हणजे 50 कोटी घेतल्याचे पुरावे द्यावे नाही तर सात आठ आमदारांचा गट सरकारातून बाहेर पडणार असा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे.
50 खोके म्हणजे स्मगलरांच्या भाषेत 50 कोटी रुपये. असे भ्रष्टाचारातून मिळालेले 50 कोटी रुपये प्रत्येकी मिळाले म्हणूनच हे शिवसेना गटातले चाळीस पन्नास आमदार गुवाहाटीत गेले असा खुल्लमखुल्ला हल्लाच आ. रवी राणा यांनी चढवला आहे. एकतर भ्रष्टाचाराचा कोट्यावधीचा हा पैसा देणारा चेकने देत नाही. बॅंकेत टाकत नाही आणि घेणाराही आपल्या बॅंक खात्यावर चेक, डिमांड ड्राफ्ट, आरटीजीएसने घेत नाही. तसे केल्यास बॅंक ट्रांझॅक्शन रेकॉर्ड स्वरुपात एक प्रकारचा पुरावा म्हणूनच समोर येवू शकतो. त्यामुळे भ्रष्टाचाराचा दोन नंबरचा व्यवहार एकतर हवाला पद्धतीने कॅशमधे होणार हे उघड आहे. कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचा पुरावा कुठेही उपलब्ध राहू नये याची सर्वजण काळजी घेतातच. त्यामुळे 50 खोक्यांच्या म्हणजे 50 कोटींच्या कथित व्यवहारची “पुरावा” द्या म्हणून मागणी करणे ही बदमाशी नव्हे का? असा प्रश्न येतो. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या म्हणण्याप्रमाणे ते केवळ आ. रवी राणा यांनाच पुरावा मागत नसून खरच असे पैसे (म्हणजे 50 -50 कोटी) आम्हाला दिले काय ते मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगावे अशी देखील मागणी करत आहेत. त्यासाठी 1 नोव्हेंबरच्या अल्टीमेटमची तारीख पुढे केली आहे.
याचा दुसरा अर्थ तुम्ही जशी तुमच्या फायद्यासाठी शिवसेना फोडली त्याच पद्धतीने आम्ही तुमचा गट फोडतो असा हा इशारा आहे. आता बच्चू कडू यांच्याकडे जाणारे नाराज आमदार कोण कोण? या आमदारांची रसद बच्चू कडू यांच्याकडे कोण पोहोचवतो? एका आमदाराचे 50 खोके म्हणजे 50 जणांचे 2500 कोटी असा हिशेब लागतो. शिवाय सुरत, गुवाहाटी, गोवा सहलीचा विमान खर्च, फाईव्ह स्टार राहणीमानाचा कोटीचा खर्च एकनाथ शिंदे यांनी केला की आणखी कुणी? असे चंद्रकांत खैरे विचारताहेत. शिंदे गटातले 40 पैकी 22 आमदार भाजपात जातील असेही सांगितले जाते. तसेच बारा खासदार देखील घरवापसी करतील किंवा भाजपात जातील असेही नॅरेटीव्ह आहे. खासकरुन “50 खोके – ओके” हे नॅरेटीव्ह ग्रामीण भागात चांगलच गाजतय. आगामी काळात 50 खोक्यांच रहस्य सांगणारे 1 लाखावर टी शर्ट शिंदे गट आमदारांच्या प्रत्येक मतदार संघात दिसतील अशी वार्ता आहे. गेल्या बैल पोळ्यात गायी म्हशी प्राण्यांच्या पाठीवर 50 खोक्यांचे नॅरेटीव्ह दिसले. त्यामुळे शिंदे गटातले मंत्रीही हादरले आहेत. शिंदे गटातल्या काही मंत्र्यांना काही विरोधक भ्रष्टाचारी म्हणून हिणवत आहेतच. कुणी चोरही म्हणतात. अर्थात आरोपांची चिखलेफेक अशीच प्रकटपणे होत असते.
शिवसेना आणि ठाकरे गट जेवढा तोडायचा तेवढा तोडून झाला. आता जास्त काही हाती लागणार नाही असा विचार दिल्लीच्या मनात आला म्हणजे शिंदे गटाचे अस्तित्व विसर्जीत झालेच म्हणून समजा. ठाकरे गटाचे उपद्रव मुल्य हाच शिंदे गटाचा प्राणवायू दिसतो. दिल्लीच्या रहस्यमय गुढ मंत्रविद्येपुढे आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील हात टेकले आहेत. “मुंबई महापालिका निवडणूका कधी होतील हे एकतर इश्वर किंवा न्यायालयच सांगू शकतो” या त्यांच्या विधानातून गंभीर इशारे मिळताहेत. हा केवळ ठाकरे यांची शिवसेनाच नव्हे तर फडणवीस शिंदे गटालाही संपवण्याचा डाव तर नव्हे? असेही बोलले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात लटकलेला आहेच. शिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलीक डांबून ठेवलेले (कोर्ट प्रक्रीया) दिसतात. शिवाय उद्धव ठाकरे यांचे कथित उजवे हात मिलींद नार्वेकर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शुभेच्छा देऊन आले आहेतच. या नार्वेकरांची तिरुपती बालाजी देवस्थानाच्या ट्रस्टी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. ती रद्द करण्याची बातमी नाही. कोण कुणाला कशासाठी वापरते ते गुलदस्त्यात आहे. एकंदरीत 50 खोक्यांचे ओझे शिंदेशाही सरकार बुडवणार अशी हवा वाहू लागल्याचे राजकीय विश्लेषकांच मत दिसतय? तुम्हाला काय वाटत?