महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट यासह सोळा आमदारांची अपात्रता अशा विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार होती. न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. या घटनापीठात न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश होता. मात्र आता ही सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दोन्ही पक्षकारांना कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. दोन्ही बाजूच्या वकिलांना एकत्र बसून चर्चा करण्यासह दोन्ही बाजू लेखी स्वरुपात मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच दोन्ही पक्षकारांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली असून सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाने शिवसेना पक्षावर हक्क सांगितला आहे. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई ही निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आहे. यापुर्वी झालेल्या सुनावणीत ‘खरी शिवसेना कुणाची’, याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटलं होतं. पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सर्वोच्च न्यायालयातच निर्णय होणार आहे.