जळगाव (अमळनेर) : पत्नीच्या पोटावर चाकूचे वार केल्याने तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चोपडा तालुक्यातील लासुर येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. चोपडा तालुक्याच्या लासुर येथील अनिल आधार भिल व त्याची पत्नी सुनंदा यांच्यात वाद होता. सुनंदा हिचे माहेर चोपडा तालुक्यातील वराड हे होते. ती माहेरी रहात होती.
तिच्या नातेवाईक मुलाच्या लग्नात ती ९ एप्रिल २०१८ रोजी लासुर येथे आली असतांना हि दुर्दैवी घटना घडली होती. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासले. त्यात आरोपी अनिल आधार याचा भाऊ व मेहुणे तसेच डॉ. देसले व डॉ. निलेश देवराज यांची साक्ष घेण्यात आली.
न्या राजीव पी पांडे यांनी अनिल यास भा. दं. वि. कलम ३०४ (२) नुसार ७ वषार्ची शिक्षा व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने अधिक शिक्षा भोगावी लागणार आहे.