नागपूर : चालत्या रेल्वेत चढताना – उतरतांना अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना भरपाई देणे आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. एका मृताच्या पत्नी व तीन अपत्यांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
या प्रकरणी न्या. अभय आहुजा यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शंकर धोत्रे असे मयताचे नाव असून ते नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होते. 4 एप्रिल 2011 रोजी ते पत्नी, मुले व शालकासोबत मुडखेड येथे जाण्यासाठी पंढरपूर येथून रेल्वेत बसले होते. कुर्डुवाडी स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर धोत्रे मुलांसाठी पाणी घेण्यासाठी खाली उतरले. दरम्यान, रेल्वे सुरु झाली. त्यावेळी धोत्रे यांनी धावत धावत रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते खाली कोसळले. त्यांचे दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली येऊन कापले गेले. काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भरपाईसाठी नागपुर येथील रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल करण्यात आला होता.
धावत्या रेल्वेत चढताना झालेला अपघात हा दुर्देवी घटनेच्या निकषात बसत नसून, ही आत्महत्या करण्याची कृती असून मयताच्या वारसदारांना भरपाई देता येणार नसल्याचे मत रेल्वे न्यायाधिकरणाने व्यक्त केले होते. मात्र उच्च न्यायालयाने हे मत चुकीचे ठरवले. संपूर्ण कुटुंब रेल्वेत वाट बघत असतांना कुणीही व्यक्ती धावत्या रेल्वेत चढण्यास मागे पुढे बघणार नाही. या प्रकरणात हा प्रकार घडला. त्यामुळे मयताचा अत्महत्या करण्याचा उद्देश नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले.