बालिकेच्या मृत्यू प्रकरणी अधीक्षिकेसह अन्य एका महिलेला तिन वर्षांची शिक्षा

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील दत्तक ग्रहण केंद्रातील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीक अधीक्षिका आणि काळजीवाहक अशा दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने अधीक्षिका व काळजीवाहक महिलेला प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंड व तिन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अधीक्षिका सुरेखा शांताराम बिजीतकर (३२, शेट्येवाडी, लांजा) व काळजीवाहक संगीता अनिल पवार (४१ रा. रखांगी चाळ, लांजा) अशी शिक्षा झालेल्या नावे आहेत.

27 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी दीड ते सायंकाळी चारच्या सुमारास महिलाश्रम लांजा येथे दत्तक ग्रहण केंद्रामध्ये सदर घटना घडली होती. या केंद्रात दाखल असलेल्या एका बालकाच्या वर्तनाबाबत अधिक्षीका सुरेखा बिजीतकर यांनी जिल्हा बालकल्याण समितीला कळवले नाही. तसेच संगीता पवार कर्णबधीर असूनही त्यांना दत्तक ग्रहण केंद्रात नेमणूक दिली. बालकाच्या वर्तनाबाबत माहिती असूनही ड्युटीवर असतांना चार बालकांना पाळण्यात ठेवून विस मिनीटे दोघीही केंद्र सोडून बाहेर गेल्या होत्या.

यादरम्यान त्या बालकाने एका बालिकेचा पाळण्यातून बाहेर आलेला हात पिरगळून तिला पाळण्यातून बाहेर काढून लादीवर आपटले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. केंद्रातील अन्य एका बालिकेलाही दुखापत केली. घटना घडल्यानंतर २ ते ३ तास अधीक्षिका व काळजीवाहक यांनी बालकांकडे लक्ष दिले नाही, अशी तक्रार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर यांनी लांजा पोलिस ठाण्यात दिली होती. हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा ठपका ठेवून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील करत होत्या.

मंगळवारी खटल्याचा निकाल पोक्सो विशेष न्यायालयात झाला. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी तर पैरवी अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपींना भादंवि कलम 304 (अ) अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार दंड, 337 मध्ये 500 रुपये दंड व पंधरा दिवस शिक्षा आणि बाल न्याय अ‍ॅक्ट 75 मध्ये प्रत्येकी पाच हजार दंड व साडेसात हजार रुपये दंड व तिन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here