लग्नपत्रिकेत नाव शेवटी टाकल्याने मारहाण

On: December 2, 2022 5:53 PM

नाशिक : लग्नपत्रिकेत आपले नाव शेवटी का टाकले याचा राग आल्याने साथीदारांसह एकाला फायटरने मारहाण करत दुकानाचे नुकसान केल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात घडला आहे. या घटनेप्रकरणी येवला शहर पोलिस स्टेशनला दंगा व दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र प्रकाश पुरे या तरुणाचे येवला बस स्टॅड परिसरात येवला – कोपरगाव रस्त्यावर महालक्ष्मी नावाचे ताडपत्री विक्रीचे दुकान आहे. 27 नोव्हेंबर रोजी रविंंद्र पुरे हा आपल्या दुकानात बसला असतांना त्याठिकाणी किशोर धोंडीराम पवार हा आपल्या मुलांसह त्याठिकाणी आला. आपले नाव लग्नपत्रिकेत शेवटी का टाकले याचा जाब विचारत त्याने शिवीगाळ सुरु केली. रविंद्र पुरे याने त्याला समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या किशोर पवार याने फोन करुन दिनेश पवार, गोकुळ पवार, रोशन पवार, मनोज पवार, चिक्या गुजरे व इतर अशा सर्वांना त्याठिकाणी बोलावून घेतले.

किशोर पवार याने रविंद्र पुरे यास फायटरने मारहाण सुरु केली. रविंद्र यास होत असलेली मारहाण बघून त्याचा भाऊ आकाश पुरे त्याला सोडवण्यासाठी आला. मात्र त्याला देखील किशोर पवार याने लोखंडी फायटरने मारहाण सुरु केली. रविंद्र पुरे याच्या दुकानाबाहेर असलेल्या ताडपत्र्यांचे फाडून नुकसान करण्यात आले. किशोरसोबत असलेल्या इतरांनी रविंद्र आणी त्याचा भाऊ आकाश या दोघांना शिवीगाळ करत संपवून टाकण्याचा दम देत तेथून प्रस्थान केले.

जखमी रविंद्र पुरे याने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर येवला शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक आर.एन. पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment