खामगाव : दहा वर्षाच्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणी संबंधित आरोपीला खामगावच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आज सकाळी न्यायालयाने हा निकाल दिला.
खामगाव तालुक्यातील पिडित बालिकेच्या आई- वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे ती बालीका आपल्या भावंडांसोबत रहात होती. २२ डिसेंबर २०१६ रोजी रामा विठ्ठल नंदनवार याने तिला दहा रुपये दाखवून सोबत बोरे घेण्यासाठी येण्यास म्हटले होते. त्यानंतत तो तिला गावाजवळच्या एका निर्जनस्थळी घेवून गेला. त्याठिकाणी त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. कुणाला काही सांगितल्यास जिवे ठार करण्याची धमकी त्याने पिडीत बालीकेला दिली होती. त्यानंतर आरोपी रामा नंदनवार याने तेथून पलायन केले होते.
पोटात होणारा त्रास तिने सहन करत दुस-या दिवशी शेजारच्या महिलेस हा प्र्कार कथन केला होता. त्यानंतर २५ डिसेंबर २०१६ रोजी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन डीवायएसपी रुपाली दरेकर यांनी तपासाअंती हे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयाने या प्रकरणात एकुण अकरा साक्षीदार तपासले.
दोष सिध्द झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी आज या गुन्हयाचा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. रजनी बावस्कर-भालेराव यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा कलम ३,२,५ आजीवन सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. एक हजार रुपये दंड भरला नाही तर दोन महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे. कलम ३,१ ह नुसार सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड सुनावण्यात आली आहे. हा दंड भरला नाही १ महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कलम ३७६ (२) (आय) व कलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यानुसार प्रत्येकी दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा दंड भरला नाही तर दोन महिने शिक्षा याप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.