नाशिक : विवाहित असूनही अविवाहित असल्याचे भासवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी रविश प्रभाकर दुरगुडे (वय 3५ रा, घाटकोपर – मुंबई) याला न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रविश प्रभाकर दुरगुडे (वय 3५रा. घाटकोपर मुंबई) याने ऑक्टोबर २०१८ ते. दि. २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पीडित महिलेशी विवाह जुळवणाऱ्या एका वेबसाईटवर ओळख करून विवाहित असूनही त्याने अविवाहित असल्याचे भासवत पीडितेशी ओळख वाढवली. तसेच खोटे बोलून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केली.
मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने रविश विरोधात नाका पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत जिल्हा व सत्र न्यायालयात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे एस. एस. खरात यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे रविश याला एका गुन्ह्यात सात वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, तसेच दुसऱ्या गुह्यात तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.