बालकास ठार करणा-या जन्मदात्रीसह भाच्याला जन्मठेप

जळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या मुलाची हत्या करणा-या जन्मदात्या आईसह तिच्या भाच्याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  अमळनेर जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला आहे. आईचे तिच्या भाच्याशी असलेले अनैतिक संबंध मुलाने पाहिले होते. त्यामुळे आपल्याच पोटच्या गोळ्याचे तुकडे तुकडे करुन त्याची हत्या करण्यात आली होती. गीताबाई दगडू पाटील (35) व तिचा भाचा समाधान विलास पाटील (25), दोघे रा. चहार्डी, ता. चोपडा जिल्हा जळगाव अशी शिक्षा झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. मंगेश दगडू पाटील असे तेरा वर्ष मयत मुलाचे नाव आहे. 2 फेब्रुवारी 2019 रोजी ही घटना घडली होती.

गीताबाई व समाधान यांचे अनैतिक संबंध होते. ही बाब वडिलांना सांगेल असे मंगेशने म्हटलेहोते. दि. 2 फेब्रुवारी 2019 रोजी गीताबाईने त्याच्या डोक्यात काठीने तीन – चार वार केले. त्यात तो बेशुद्ध झाला. समाधानने त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला गोणीत घातले. रात्री गीताबाई समाधानच्या घरी आली. तेथे दोघांनी त्याच्या शरीराचे कु-हाड, चाकू व विळ्याने तुकडे तुकडे केले व गोणीत भरुन त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी 26 रोजी गीताबाई व समाधान या दोघांना अटक केली होती.

सरकारी वकील अ‍ॅड. किशोर बागुल यांनी याप्रकरणी एकुण पंधरा साक्षीदार तपासले. त्यात न्यायालयाने डीएनए अहवाल, डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. नीलेश देवराज, कुलदीप पाटील, तपास अधिकारी योगेश तांदळे, श्वान पथकाचे विनोद चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून गीताबाई व समाधान यांना जन्मठेपेची शिक्षा तसेच पुरावा नष्ट केला म्हणून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अटक झाल्यापासून आरोपी जिल्हा कारागृहात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here