नागपूर : लैगिक हेतू नसल्यास अल्पवयीन मुलीच्या पाठीवर आणि डोक्यावरुन हात ‘फिरविल्यामुळे विनयभंग होत नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. याशिवाय आरोपीची निर्दोष सुटका केली. संबंधीत प्रकरणावर न्या. भारती डांगरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मयूर बाबाराव येलोरे (29) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील रहिवासी आहे. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड तर घरात बळजबरीने प्रवेश करण्यासाठी चार महिने कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.
सत्र न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती मंजूर करून शिक्षा रद्द केली. घटनेच्या वेळी आरोपी अठरा वर्ष वयाचा होता तर पीडित मुलगी तेरा वर्ष वयाची होती. पीडित मुलीला आरोपी लहानपणापासून ओळखत होता. आरोपी 15 मार्च 2012 रोजी मुलीच्या घरी गेला होता.
दरम्यान, त्याने मुलीच्या पाठीवरुन, डोक्यावरून हात फिरवून ती खूप मोठी झाली, असे म्हटले. त्यामागे त्याचा वाईट हेतू होता, असा आरोप मुलीने तक्रारीत केला नाही. तिने केवळ आरोपीच्या या कृतीमुळे वाईट व अस्वस्थ वाटले असा जबाब दिला. तसेच आरोपीने पाठ व डोक्यावरून हात फिरविण्याशिवाय अधिक काही केल्याचे पोलिसांचे म्हणणे नाही असे न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले. आरोपीतर्फे अँड. अमोल हुंगे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.