नाशिक : पंचवटीतील टोळीयुद्धातून सन २०१७ साली झालेल्या खुनाच्या घटनेतील चौघांना तर बंदुकीतून गोळी झाडून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघा आरोपींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गणेश उघडे, जितेश मुर्तडक, संतोष पगारे, संतोष उघडे, शेखर निकम व केतन निकम अशा सहा आरोपींचा शिक्षेत समावेश आहे.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश वर्धन देसाई यांच्या न्यायालयाने किरण राहुल निकम खून खटल्यात गणेश अशोक उघडे, जितेश ऊर्फ बंडू संपत मुर्तडक, संतोष विजय पगारे, संतोष अशोक उघडे या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्यायालयाने डाळींब व्यापारी संदीप लाड यांच्यावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात शेखर राहुल निकम व केतन राहुल निकम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नाशिकच्या पंचवटीत सन २०१७ मध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकल्याने दोन्ही गटांकडून एकमेकांवर दहशत निर्माण करून परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी परस्परविरोधी हल्ले करण्यात आले होते. यात १८ मे २०१८ रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास नवनाथनगर पंचवटी येथे सावळे यांच्या घरासमोरून किरण राहुल निकम हा मोटारसायकलवरून जात होता. त्यावेळी गणेश उघडे, जितेश मुर्तडक, संतोष पगारे व संतोष उघडे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी किरणला थांबवून भांडणाची कुरापत काढत धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला होता. या हल्ल्यात सर्व हल्लेखोरांनी किरण निकम याच्यावर सुमारे १०१ वार केले होते.
या गुन्ह्यात तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ यांनी आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात १६ साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला. गणेश उघडे, जितेश मुर्तडक, संतोष पगारे व संतोष उघडे यांना जन्मठेपेसह १० हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोन्ही खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी सरकार पक्षाकडून युक्तीवाद केला. या दोन्ही निकालांकडे नाशिककरांचे लक्ष लागले होते. यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात मंगळवारी अंतिम सुनावणी प्रसंगी गर्दी झालेली दिसून आली. यावेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.