भाजपाला ब्लॅकमेल कोण करतय – पंकजा मुंडे की एकनाथ खडसे?

देशातला मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष असलेल्या भाजपला नेमके कोण ब्लॅकमेल करत आहे? ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे की एकनाथ खडसे असा प्रश्न राजकीय तज्ञ आणि जनतेतून विचारला जात आहे. पंकजाताईंचं गाजलेलं विधान “मी भाजपची आहे पण पक्ष माझा नाही” यावर रणकंदन माजलय. पंकजाताई विधानसभा निवडणुकीत हरल्या. भाजपात असल्या तरी त्यांच राजकारण फडणवीसांनी थप्पीला लावल ते एकनाथ खडसेंप्रमाणेच. खडसेंची डाळ शिजू दिली नाही. मुख्यमंत्री व्हायला निघालेल्या खडसेंच भाजपतल जहाज किनाऱ्यावर आदळल तस ते पर्याय म्हणून रा.कॉ. त शिरले.

अलीकडेच त्यांनी भगवानगडावर जाऊन पंकजा मुंडे यांची भेट घेऊन “बंद दाराआड” चर्चा केली. बहुदा रा.कॉ.त येण्याचा प्रस्ताव दिला असावा. भाजपात असतांना खडसेजींनी तेव्हाही पंकजाताई सोबत नाराजीचा लाव्हा (पाढा) उकळला. तेव्हा पंकजांनी पक्षाला निर्वाणीचे इशारे दिले. नंतर मात्र खडसेजींनी पंकजांच्या वाटचालीत आपणास गृहीत धरू नये असा सूर लावला. आजकाल बहुदा प्रत्येक नेता “दोन डगरींवर पाय ठेवून असतो”. आपला पक्षाचा भरोसा कोणाला वाटत नसावा. राजकीय पक्षांच बॅनर मिळालं की कोण नेता कशी 700 पिढ्यांची कमाई करतो याचा पक्षाकडे अचूक हिशेब असावा. केवळ संपत्तीच नव्हे तर यांच्याच घरात साखर कारखाने, मुला-मुलींना आमदारकी, खासदारकी, शिक्षण संस्था, कारखानदारी गडप करण्याची यांची चतुराई लोकांच्या लक्षात आली आहे.

पंकजाताईंचं यापूर्वीचे आणखी एक विधान हा माझ्या बापानं वाढवलेला पक्ष आहे. माझ्या बापाचा पक्ष आहे माझ्या खांद्यावर कुणाला बंदूक ठेवू देणार नाही. दिल्लीत अमित शहा यांना भेटणार….भेटा …. भेटा अवश्य भेटा. पक्षात अन्याय होत असल्याची टेप अनेक नेते वाजवतात. प्रचंड खदखद व्यक्त करतात. लढण्याचा माहोल तयार करतात. तलवारी उपसत गर्जतात. बंदुका बाहेर काढणे म्यान करणे हा खेळ काही काळ चालतो. नाराजी असली तरी जेथे अन्याय झाल्याचं वाटतं तेथे त्या पक्षाला लाथा झाडून बाहेर पडण्याची यांची हिंमत नाही आणि निवडणुका तोंडावर असल्याने एखादा राजकीय पक्षही कोंडी करू पाहणाऱ्या नेत्याला त्याच पद्धतीने  (म्हणजे लाथा घालून) हाकलून देऊ शकत नाही. उद्याच्या राजकीय लाभावर नजर ठेवून स्वतःचा समाज किंवा समाज घटक (ओबीसी) पक्षाचे नेतृत्व करत असल्याचे दर्शवत त्याच क्षमतेच्या पंकजाताईंना सहानुभूती म्हणून भेटत स्वतःचे राजकीय कार्ड चमकवण्या सोबत पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आल्याचे भासवणाऱ्या या ताईंना रा.कॉ. त आणण्याचे श्रेय का लाटू नये असा वरकरणी खडसेजींचा हिशेब असला तरी तसे करण्यात या दोघांचा भाजपवर दबाव आणण्याचा अंतस्थ हेतू तर नसावा अशी आशंका राजकीय क्षेत्रातल्या एका गटाकडून व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडे या चतुर आहेत. विधानसभेत गेल्या वेळी त्या हरल्या. राजकीय प्रवासात धनंजय – पंकजा या भाऊ बहिणींची राखी पौर्णिमा आणि भाऊबंदकीची भांडणे महाराष्ट्र बघत आलाय. तोच खेळ भाजपात मायावती – टंडन यांच्याबाबत दिसला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रियाताई सुळे – अजितदादा यांच्याबाबत हेच चित्र दिसते. मुख्यमंत्रीपदाकडे जाण्याचा मार्ग, राजकीय शक्ती, संधी, श्रेष्ठींची मर्जी संपादन, तडजोडी, कुरघोडी करून मिळवण्याचा एक रस्ता सांगितला जातो. काहीच आठवड्यांपूर्वी शिंदे यांच्या मंत्रिपदाच्या विस्तारात मंत्रिपद देतोय अशी लॉटरी तिकीट विकणारा एक महाभारत नागपुरात पकडला गेला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात नागपूर शहरातील रेशीम बागेच्या कृपाप्रसादाचा मोठा हात असल्याचे सांगितले जाते. कधी काळी भाजप हा वाण्या ब्राह्मणांचा पक्ष होता तो आपणच राज्यभर वाढवला असे म्हणणाऱ्या खडसे साहेबांना तेव्हा नागपुरी हिसका दाखवण्यात आला.

आता फायदेशीर राजकीय लाभ कोणता पक्ष देऊ शकतो, जिकडे प्रचंड लाभ तिकडे आम्ही अशा भूमिकेत मंडळी आलेली दिसते. चातुरवर्ण्य उतरंडीत प्रथम स्थानावरच्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देऊन झाले.  क्षत्रिय म्हणजेच मराठा बहुजन ओबीसी नाराज म्हणून ओरडा झाला. आता एकनाथ शिंदे यांना सीएम पदावर बसवले तरी महाराष्ट्रापेक्षा 2024 च्या लोकसभेच्या सत्तास्थानाकडे राज्यात 45 जागांचे उद्दिष्ट महत्त्वाचे ठरले आहे.

मुंबईतल्या 14 टक्के मराठी मतांवर डोळा ठेवून राज ठाकरे यांच्याशी पुन्हा हात मिळवणी सुरू दिसते. टारगेट गाठण्यासाठी शिंदेशाही देखील डस्टबिन मध्ये टाकण्याचा खेळ होऊ शकतो असे राजकीय ज्योतिषी सांगत आहेत. ठाकरेशाही – शिंदेशाही – फडणवीशी जोशात आहे.  भाजप शिवसेना रा.कॉ. काँग्रेस दुसरीही अस्तित्व दाखवते.  त्यात पटोले, संजय राऊत, अंधारे भाजपेतरांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे गठ्ठा घेऊन फिरणारे किरीट सोमय्या हे देखील गाजत आहेत. कर्नाटक निकालाने काँग्रेसमध्ये हुरुप आला आहे. सध्या चर्चा पंकजा आणि खडसे यांची असली तरी सगळे तयारीचे नेते आहेत. त्या साऱ्यांचे पाणी झोखणारे दिल्लीत आहेत. महाराष्ट्रात ते 15 कोटीचे आहेत.  आताशा कुठे रंग भरतोय. अंमळ  थोड थांबायला, प्रतीक्षा करायला काय हरकत? जस्ट वेट अँड वॉच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here