महिला रुग्णाचा विनयभंग करणा-या डॉक्टरला कारावासाची शिक्षा

जळगाव : महिला रुग्णाचा विनयभंग करणा-या डॉक्टरला चाळीसगाव न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. डॉ. मंगलसिंग परदेशी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या चाळीसगाव येथील डॉक्टरचे नाव आहे. 25 ऑक्टोबर 2019 रोजी पिडीत महिला रुग्ण चाळीसगाव येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमधील आयसीयु मधे उपचार घेत होती. त्यावेळी ती एकटी असल्याचे बघून डॉ. मंगलसिंग परदेशी याने तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले होते.

Bapurao bhosale ASI

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टरविरुद्ध गु.र.न. 325/2019 भा.द.वि. 354 आणि 354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक फौजदार बापुराव भोसले यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करुन चाळीसगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. नियमित फौजदारी खटला क्रमांक 334/2019 ची सुनावणी चाळीसगाव न्यायदंडाधिकारी वर्ग एक न्यायालय क्रमांक 2 श्रीमती एस. आर. शिंदे यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. डॉ. मंगलसिंग परदेशी यास भा.द.वि. 354 नुसार दोन वर्ष सश्रम कारावास आणि रुपये 7 हजार रुपये दंड (दंड न भरल्यास दोन महिने कारावास) तसेच भा.द.वि. 354 अ नुसार एक वर्ष सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंड (दंड न भरल्यास दोन महिने कारावास) तसेच या रकमेतून पिडीत महिलेस दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचाआदेश देण्यात आला आहे.

सरकार  पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मिलिंद येवले यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. संदीप पाटील याचे याकामी सहकार्य लाभले. पो.ना रणजित सोनवणे यांनी पैरवी अधिकारी तर केस वॉच म्हणून पो. कॉ.प्रविण देवरे यांचे सहकार्य लाभले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here