अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते , परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पर्यटन मंत्री तसेच युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा देखील याचिकेत समावेश होता.
परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रमोट करता येवू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतली होती. त्या भुमिकेबाबत देशभरातील अनेक संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयानं आव्हान देण्यात आले होते. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्व विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हा निकाल दिला आहे. अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्याशिवाय राज्यांना विद्यार्थ्यांना प्रमोट करता येवू शकत नाही, असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.