नाशिक : सिन्नर येथील संजीवनगर परिसरात महिलेचा खून करणा-या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुर्वेश गेंदाला चौरे (वय 30) (रा. शिवनगर कॉलनी भोपाळ मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्या. जगमलानी यांच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध खूनाचा आरोप सिद्ध झाला आहे. न्यायालयाने त्याला भा.द.वि. 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साथी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
21 नोव्हेंबर 2019 रोजी सिन्नर शहरातील संजीवनगर परिसरात ही घटना घडली होती. या गुन्ह्यतील आरोपी दुर्वेश गेंदालाल चौरे याने रेखा मेहरा हिचा ओढणीने गळा आवळून तिला जीवे ठार केले होते. या घटनेप्रकरणी सिन्नर पोलिस स्टेशनला सहायक फौजदार जी. व्ही. परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला. आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे संकलीत करुन सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. या खटल्यात सरकारी अभियोक्ता कडवे यांच्यासह पैरवी अधिकारी हे.कॉ. मधुकर पाडवी, महिला हे.कॉ. जे. के. निकाळ यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाला आहे.