पेट्रोल पंप व्यवस्थापकाची लुट करणा-यास अटक

On: February 23, 2024 10:47 AM

जळगाव : पेट्रोलपंप चालकाच्या ताब्यातील 1 लाख 93 हजार 500 रुपयांची रोकड जबरीने हिसकावून पलायन करणा-या तिघांपैकी एकाला एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध  पथकाने अटक केली आहे. पुढील तपासकामी त्याला जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ऋषिकेश रमेश मावळे रा. कुसुंबा ता. जळगाव असे लुट करणा-या अटकेतील तरुणाचे नाव आहे.

जामनेर येथील रहिवासी निलेश रतन पवार हे जामनेर तालुक्यातील शहापुर येथील त्रिवेणी पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. पेट्रोल पंपावरील हिशेबाची 1 लाख 93 हजार 500 रुपयांची रोकड घेऊन ते 18 फेब्रुवारी रोजी जामनेरच्या दिशेने मोटारसायकलने येत होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर ते शहापुर दरम्यान बेल फाट्यानजीक मोटार सायकलने ट्रिपलसीट आलेल्या तिघा तरुणांनी त्यांची वाट अडवली. निलेश पवार यांना तिघांनी चापटाबुक्यानी मारहाण करत त्यांच्या कब्जातील रोकड जबरीने हिसकावून घेत पलायन केले होते. या घटनेप्रकरणी निलेश पवार यांनी जामनेर पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान हा गुन्हा कुसुंबा येथील तरुणांनी केल्याचे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. बबन आव्हाड यांना समजले. या माहितीच्या आधारे  त्यांनी आपल्या गुन्हे शोध  पथकाच्या मदतीने कुसुंबा येथून ऋषिकेश रमेश मावळे (रा. साईसिटी कुसुंबा) यास ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने आपला गुन्हा कबुल करत गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल काढून दिली. हा गुन्हा दोघा साथीदारांच्या मदतीने केल्याचे देखील त्याने कबुल केले.

पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दत्तात्र पोटे, दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना सुधिर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, मपोकॉ. राजश्री बाविस्कर आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील संशयीत आरोपीस पुढील तपासकामी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले  आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment