जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क)- गणपती विसर्जनाची रात्र होती…यावल तालुक्यातील भालोद या गावात उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांचा आवाज, मिरवणुकीची लगबग आणि त्यातच चार मित्रांची नेहमीप्रमाणे रंगलेली मैफिल…रमेश डोगरसिंग भाबर, संजय सतीष कोळी, सुरज वासुदेव कोळी आणि सुरज प्रमोद नेमाडे. चौघेही एकत्र फिरत होते. मद्यपान झाले. त्यानंतर भूक लागली आणि चौघांनी मिळून मांसाहारी जेवण मागवले. काही वेळातच मासळीची ताटे समोर आली. पण याच जेवणाच्या ताटात पुढे एका माणसाच्या आयुष्याचा शेवट लिहिला आहे, याची कल्पना त्यावेळी कुणालाच नव्हती…

सगळे जेवायला बसले असतानाच सुरज वासुदेव कोळी याचे वडील वासुदेव कोळी तेथे आले. त्यांनी रमेशच्या ताटातील मासळीचा एक तुकडा खाण्यास घेतला. ही छोटीशी गोष्ट रमेशला प्रचंड संताप आणणारी ठरली. मद्यधुंद अवस्थेत रमेशने वासुदेव कोळी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. “तू आणि तुझा मुलगा सुरज… दोघे बाप-बेटे असेच करता. फुकटचे खाता…” रमेशच्या या बोलण्याने वातावरण अचानक तापले.
सुरजने परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून आपल्या वडिलांना तेथून घरी जाण्यास सांगितले. वासुदेव कोळी तेथून गुपचूप घरी निघून गेले. पण खरी ठिणगी आता पेटली होती…जुन्या घटनेचा रागही मनात होता. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही जेवणाच्या वेळी रमेशने वासुदेव कोळी यांच्यासोबत मारहाण केल्याची घटना घडली होती.

त्यामुळे त्या रात्रीचा वाद हा केवळ मासळीच्या एका तुकड्यावर थांबला नाही. वासुदेव निघून गेल्यानंतर रमेश आणि त्याचे तिघे मित्र यांच्यातच वाद सुरू झाला. एका बाजूला रमेश…आणि दुसऱ्या बाजूला त्याचे तीन मित्र…दारूच्या नशेत सुरू झालेला शब्दांचा वाद काही क्षणांतच संतापाच्या टोकाला पोहोचला.
रमेशने तिघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर…घडले ते भयानक होते. एका दगडाच्या घावाने सगळे संपले! वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी मिळून रमेशवर हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. जवळ पडलेला एक मोठा दगड त्यांच्या हातात आला. रमेशच्या डोक्यावर त्या दगडाने घाव करण्यात आला. घाव इतका गंभीर होता की रमेशचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी जो व्यक्ती आपल्या मित्रांसोबत बसून जेवत होता, तो आता रक्ताच्या थारोळ्यात निश्चल पडला होता.

आता तिघांसमोर आणखी एक प्रश्न उभा राहिला — रमेशचा मृतदेह लपवायचा कसा? पोलिसांच्या तपासानुसार, तिघांनी मिळून रमेशचा मृतदेह एका खड्ड्यात टाकला. घटनास्थळ सोडून तिघेही निघून गेले. त्यांना कदाचित वाटले असेल की या घटनेचा कुणालाच सुगावा लागणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी या हत्येचे गूढ उलगडण्यास सुरुवात झाली.
२१ सप्टेंबर. सकाळी सुमारे ११ वाजता. रमेशचा भाऊ इंदरसिंग डोगरसिंग भाबर आपल्या कुटुंबासह शेतात मजुरीसाठी निघाला होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक फोन आला. “तुझा भाऊ रमेश… तो एका खड्ड्यात पडलेला आहे. तो मरण पावला आहे…” हे ऐकताच इंदरसिंगच्या पायाखालची जमीनच सरकली. कामाला जाण्याचा विचार बाजूला ठेवून तो थेट घटनास्थळी धावला. गावचे पोलिस पाटील लक्ष्मण पाटील यांनाही घटनेची माहिती मिळाली होती. ते देखील घटनास्थळी पोहोचले होते.
इंदरसिंग तेथे पोहोचला…आणि त्याने जे पाहिले, ते कोणत्याही भावासाठी हादरवून टाकणारे होते. भावाची ओळख पटली… पण दृश्य काळीज पिळवटून टाकणारे होते. खड्ड्यात रमेशचा मृतदेह पडला होता. डोक्यावर गंभीर दुखापत होती. पाठीवर आणि पोटावर माराच्या खुणा होत्या. दोन्ही पायांची त्वचा निघालेली होती. डोक्याला झालेली गंभीर दुखापत इतकी भयंकर होती की मेंदूचा काही भाग बाहेर आला होता. आणि मृतदेहाच्या काही अंतरावर…रक्ताने माखलेला एक मोठा दगड पडला होता.
इंदरसिंगने आपल्या भावाची ओळख पटवली. घटना आता अपघात नसून घातपात असल्याचा संशय अधिकच बळावला. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, यावल येथे पाठवण्यात आला.
मात्र पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता—रमेशचा खून नेमका कोणी केला? आणि का? तपास सुरू असतानाच इंदरसिंगने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. त्याने सांगितले की, घटनेच्या आदल्या रात्री रमेश आपल्या तीन मित्रांसोबत होता. त्यापैकी सुरज वासुदेव कोळी याला इंदरसिंगने नंतर लंगडत चालताना पाहिले होते. इतकेच नव्हे…सुरजच्या शर्टावर रक्ताचे डागही दिसले होते. सुरज घाबरलेल्या अवस्थेत असल्याचेही इंदरसिंगच्या लक्षात आले होते.
पोलिसांच्या तपासाला आता दिशा मिळाली. संशयाची सुई सुरजकडे वळली. फैजपूर पोलिसांनी सुरज वासुदेव कोळी याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सुरजने घटनेबाबत माहिती दिली आणि इतर दोघांचा सहभागही सांगितल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी संजय सतीष कोळी आणि सुरज प्रमोद नेमाडे यांच्याविषयीही तपास सुरू केला. क्रमाक्रमाने तिघा संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
सात-आठ वर्षांपासून भालोद परिसरात राहून शेतमजुरी करणाऱ्या दोन भावांपैकी रमेशचा मृत्यू अखेर मित्रांच्याच वादातून झाल्याचा आरोप तपासात समोर आला. एका ताटातील मासळीचा तुकडा…दारूच्या नशेत झालेले काही शब्द…जुन्या वादाची पार्श्वभूमी…शिवीगाळ…आणि त्यानंतर दगडाने झालेला जीवघेणा हल्ला…या सगळ्यामुळे गणपती विसर्जनाच्या आनंदाच्या रात्री भालोद गाव हादरून गेले. ज्या मित्रांसोबत रमेश काही तासांपूर्वी हसत-खेळत फिरत होता, त्याच मित्रांवर त्याच्या हत्येचा आरोप झाला. फैजपूर पोलिसांनी या प्रकरणात संजय सतीष कोळी, सुरज वासुदेव कोळी आणि सुरज प्रमोद नेमाडे या तिघांना अटक केली आहे.
या तपासात सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे, पोलिस उपनिरीक्षक संतोष चौधरी, सहायक फौजदार संजय झाल्टे आणि हवालदार विकास सोनवणे यांनी सहकार्य केले. मात्र या संपूर्ण घटनेने एक प्रश्न नक्कीच मागे ठेवला आहे—ज्या मैत्रीची सुरुवात एकत्र बसून दारू पिण्यापासून झाली, त्याच मैत्रीचा शेवट एका मित्राच्या रक्ताने माखलेल्या दगडाजवळ का झाला? एका छोट्याशा वादाने पेटलेला राग काही मिनिटांत एवढा वाढला की, चार मित्रांपैकी एकाचा जीव गेला आणि उरलेल्यांवर खुनाचा आरोप आला. भालोदच्या त्या रात्रीची हीच सर्वात धक्कादायक कहाणी ठरली.








