जळगाव, दि. १६ (प्रतिनिधी) – अनुभूती स्कूल, जळगांव येथे दि. १६ जुलै २०२४ मंगळवार रोजी दींडीसह आषाढी एकादशी आनंदात साजरी करण्यात आली. एकादशीच्या आदल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री कासार, भावना शिंदे, योगिता सुर्वे, हर्षा वाणी यांनी केले होते. यात विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी’ या सुंदर भजनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यही सादर केले.
यानंतर शालेय परिसरात विठूनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या भक्तीमय वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी पाऊलीवर ताल धरत दिंडीत सहभाग घेतला. मैदानावर रिंगण सोहळा रंगला. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ या जयघोषाने कार्यक्रम उत्साहात पार पडला. यासाठी अरविंद बडगुजर, ज्ञानेश्वर सोनवणे सर व भुषण खैरनार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता.