जळगाव : सहाय्यक कामगार आयुक्तांकडे सुरु असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्याचे सांगत त्या मोबदल्यात तडजोडीअंती 36 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जळगांव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव (वर्ग 3) येथील कामगार निरीक्षकास एसीबी पथकाने रंगेहात पकडले. चंद्रकांत पाटील असे या लाचखोर कामगार निरीक्षकाचे नाव आहे.
या लाच प्रकारणातील तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व मुकादम आहेत. तक्रारदाराचे मित्र देखील मुकादम होते. त्यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. त्याबाबत सुरु असलेल्या सुनावणीचा निकाल सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून लावून देण्याच्या मोबदल्यात कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी तक्रारदारास 5 ऑगस्ट रोजी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे रितसर तक्रार दिली. पंचांसमक्ष तडजोडीअंती 36 हजार रुपये देण्या – घेण्याचे निश्चित झाले. ठरल्यानुसार 8 ऑगस्ट रोजी पुन्हा लाचेची मागणी करण्यात आली व 36 हजार रुपये स्वीकारताना कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई व मदत पथकातील पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर,पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो कॉ सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी, पो.ना. बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे, पोना, किशोर महाजन आदींनी या कारवाई कामी सहभाग घेतला.