जळगाव, दि.१९ (प्रतिनिधी) – ‘मसाले पिकांच्या शाश्वत शेतीसाठी उच्च तंत्रज्ञान, शुद्ध बी-बियाणे, टिश्यूकल्चर रोपे, आधुनिक सिंचनाची व फर्टिगेशनची व्यवस्था झाली तर मसाले पिकांची शेती परवडणारी ठरेल, असा सूर तज्ज्ञांचा निघाला. तर ‘जगभरातील मसाले पिकांच्या शेतीत प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे; या स्पर्धेत अव्वल ठरायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे,’ असे विचार डॉ. एच.पी. सिंग यांनी व्यक्त केले.
यात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रिसिजन फार्मिंग, गुणवत्ता पूर्ण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मसाले पिकासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. याबाबत या राष्ट्रीय मसाले परिषदेत चर्चा करण्यात आली. यात ७ तांत्रिक सत्रे, ५६ पेपर्स, ३६ किनोट ऍड्रेस, २६ प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. दोन दिवसात तज्ञांनी केलेल्या चर्चेतून त्याचा अहवाल तयार करून शासनाकडे लवकरच पाठवून त्याची ध्येयधोरण ठरवण्याकामी मोलाची भूमिका असेल. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन फार्मफ्रेश फूड्स लि., कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), यांच्या संयुक्त विद्यमाने (मसाले व सुगंधी पिकांच्या मूल्यवर्धित साखळी व्यवस्थापन) या ‘राष्ट्रीय मसाले परिषद २०२५’ चा समारोप जैन हिल्स च्या परिश्रम हॉलमध्ये झाला.
याप्रसंगी चाईचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, प्रमुख अतिथी म्हणून अॅग्रीकल्चर सायन्स टिस रिक्रूटमेंट बोर्ड दिल्लीचे सदस्य डॉ. मेजर सिंग, डॉक्टर वायएसआर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. गोपाल, माजी कुलगुरु डॉ. टी. जानकीराम, आयआयएसआरचे माजी संचालक डॉ. निर्मलबाबु, जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. अनिल ढाके उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. निर्मलबाबु यांनी केले. जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ बालकृष्ण यादव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. डॉ. सुब्रह्मण्यम यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. के. बी. पाटील यांनी आभार मानले. भारतभरातील आलेल्या तज्ज्ञांचे जैन हिल्स येथील दोन सभागृहांमध्ये तांत्रिक सादरीकरण झाले. याबाबतचा एकत्रित अहवाल या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक निर्मल कुमार यांनी सादर केला. यात बडी हांडा हॉलमधील सत्रात मसाल्यांमध्ये मूल्यवर्धितीत व्यवस्थापन यावर संशोधन पेपर सादर केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. टी. जानकीराम, सहअध्यक्ष डॉ पद्मनाभन बी, संयोजक म्हणुन डॉ. के. बी. पाटील, सुनील गुप्ता, डॉ. टी. जाकीरीया होते.
मिरची बाजारात भारताचे जागतिक नेतृत्व यासह प्रमुख मसाल्यांची औषधी गुणधर्म यावर डॉ. टी. जाकीरीया यांनी सादरीकरण केले. वैविध्यपूर्ण वाण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि मजबूत निर्यात धोरणांद्वारे चालवलेले प्रयत्न सांगितले. दीर्घकालीन यशासाठी शाश्वत कृषी पद्धतींना प्राधान्य दिले पाहिजे. हवामान बदल आणि बाजारातील चढउतारांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि स्थानिक समुदायांमध्ये भागीदारी वाढवणे. शेतकऱ्यांना स्थानिक बाजारभावाच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळवून देतात त्यासाठी त्यांनी जैन इरिगेशनची करार शेती सारखे मॉडेल महत्त्वाचे ठरेल. जैन फार्म फ्रेश फुड चे सुनील गुप्ता यांनी मसाल्यांच्या संदर्भात जीएमपीएस आणि जीटीपीएस साठी गुणवत्ता आणि मानके यावर सादरीकरण केले. त्यात त्यांनी फुड सेफ्टी, पॅकिंग, क्लिनिंग सह जागतिक मानांकनासह गुणवत्ता पूर्ण उत्पादन घेता येऊ शकते. जैन व्हली स्पाईस हे मसाल्या पिकातील नैसर्गिकता जपते. सूर्यप्रकाशात किंवा खुल्या वातावरणात मिरची, हळद सह अन्य मसाल्यांची पिके वाळवू नये. त्यासाठी कंट्रोल डिहाइड्रेशन केले पाहिजे. दीपक पारिख यांनी मसाले आणि सुगंधी पदार्थांच्या मूल्य साखळीमध्ये नाविन्यपूर्ण संशोधनावर भाष्य केले. मसाल्यांची पिके उत्पादनात भारत महत्त्वाचा देश आहे मात्र निर्यातीत आपला प्रभाव कमी होताना दिसतो आहे. मसाल्याची मूल्यवर्धित शेतीसाठी आव्हाने,दळणवळणाच्या वेळी हाताळणी, गुणवत्ता यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. यासाठी डाटा बेसचा वापर करून कृत्रिम बुध्दिमत्तेसह अन्य डिजिटल साधनांचा वापर केला पाहिजे. डॉ. बी. नीरजा प्रभाकर यांनी हळदीतील आवश्यक तेलांच्या वाढीच्या उत्पादनाच्या निष्कर्ष आणि गुणवत्तेवरील अभ्यास यावर सादरीकरण केले. परिश्रम हॉलमध्ये मसाल्यांमध्ये उत्पादन प्रणाली आणि मूल्यवर्धन आणि दर्जेदार बियाणे, लागवड साहित्य आणि वाढीव नफ्यासाठी वनस्पती आरोग्य सेवेतील नवकल्पना या विषयावर हे सत्र झाले.
त्याचे अध्यक्ष डॉ. प्रभात कुमार, डॉ. अनिल पाटील, डॉ. विकास बोरोले आदि होते. जैन इरिगेशनचे बी. डी. जडे यांनी मसाले पिकांमध्ये ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन यांचा उपयोग, डॉ जयशंकर परिहार यांनी गुणवत्तेवरील मसाले पदार्थांच्या जीओ मेटिक या विषयावर प्रकाश झोत टाकला. तर समाधान बागूल यांनी अश्वगंधा आणि इसबगोल या औषधी वनस्पतींबाबत सादरीकरण केले. जैन इरिगेशन चे डॉ.बालकृष्ण यादव यांनी काळी मिरी उत्पादनाबाबत सांगितले. डॉ. एच. पी. सिंग, डॉ. अनिल ढाके यांच्या हस्ते तांत्रिक सत्रात सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तज्ञांचे उत्कृष्ट सादरीकरणाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यात डॉ. गोपाल के डॉ. टी जानकीराम, डॉ. नीरजा प्रभाकर, डॉ. एस एन गवाडे, डॉ. रघुवीर सिलारो, डॉ. याइर एशेल, डॉ. पंचभाई, डॉ बाळकृष्ण यादव यांचा समावेश होता.