घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील झटाळा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत विधी साक्षरता शिबीर मंगळवारी आयोजित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सह दिवाणी न्यायाधीश व फौजदारी न्यायाधीश अतुल अ. उत्पात उपस्थित होते.
राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (यवतमाळ) एन. व्ही. न्हावकर, सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी झटाळा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९, वाहतूक नियम व लैंगिक गुन्ह्यापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ इत्यादी विषयांवर संदर्भात विधी साक्षरता शिबीर संपन्न झाले.
या वेळी घाटंजी येथील न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश तसेच फौजदारी न्यायाधीश अतुल अ. उत्पात यांनी, विद्यार्थ्यांना भारतीय संविधान तसेच मुलभूत कर्तव्ये यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच आदर्श विद्यार्थी होण्याकरीता राष्ट्रीय प्रतिज्ञेनुसार सर्व भारतीयांशी बंधुभाव असने, सर्व वडीलधाऱ्या नागरीकांचा मान ठेवने व सर्वांशी सौजन्याने वागने आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
गुन्हा म्हणजे काय? विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या शब्दात त्यांनी समजावून सांगितले. तसेच समाजात गुन्हा घडत असल्यास सदर घटनेची माहिती तात्काळ पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर देण्याबाबत सूचीत केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना चांगला व वाईट स्पर्शातील फरक सांगितला. विद्यार्थ्यांपैकी मुलगा अगर मुलगी यांना कुणी वाईट स्पर्श केल्यास स्व:रक्षण अधिकाराचा उपयोग करून त्याचा विरोध करणे तसेच तात्काळ पालक व शिक्षकांना त्यासंदर्भात माहिती सांगणे या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
सोशल मीडियाचा वापर केवळ चांगल्या कामासाठी व अभ्यासासाठी करण्याचे आवाहन या प्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश व फौजदारी न्यायाधीश अतुल अ. उत्पात यांनी केले. झटाळा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील कार्यक्रमात बहुसंख्य शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व घाटंजी न्यायालयातील कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.