मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. याशिवाय मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देखील दिली आहे. यापुढे पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करतील. त्यामुळे मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयानुसार ठरणार आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी दीर्घकाळापासून सुरु होती. मराठा समाजाने काढलेले मुक मोर्चे व नंतर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरीसह शिक्षणातील आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. उच्च न्यायालयातील सुनावणीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर ल्यानंतर हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी ११ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होण्याची विनंती मध्यस्थांची बाजू सादर करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्य याचिका असल्याने राज्याला अगोदर युक्तिवाद करु देण्याची विनंती राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी मांडली होती.