घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील वासरी येथील भारत निर्माण योजनेचे ग्राम आरोग्य पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष दत्ताजी जाधव यांची दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर (घाटंजी) यांनी निर्दोष मुक्तता केली. जाधव यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. तथापि, सचिव सखुबाई कचाडे यांचे तपासादरम्यान निधन झाले आहे.
घाटंजी तालुक्यातील वासरी येथील भारत निर्माण योजनेचे ग्राम आरोग्य पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष दत्ताजी देवसिंग जाधव व सचिव सखुबाई कचाडे यांनी १२ लाख ६८ हजार ६१८ रुपयाचा अपहार केल्या प्रकरणी फिर्यादी प्रियंका प्रशांत धांदे यांच्या तक्रारी नुसार दत्ताजी जाधव, सखुबाई कचाडे यांचेविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६९ व ४७७ (अ) सह कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. गुरनुले यांनी करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६९ व ४७७ (अ) सह कलम ३४ प्रकरणात आरोपी दत्ताजी देवसिंग जाधव याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी दत्ताजी जाधव याच्यातर्फे घाटंजी न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी बाजु मांडली.