शासनाचा लाभ वंचित, गरजू घटकांपर्यंत पोहचवा – न्यायमूर्ती अविनाश घरोटे

यवतमाळ – घाटंजी / अयनुद्दीन सोलंकी – सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचल्या नाही तर, संबंधित लाभार्थी शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे शासकीय सेवा व योजनांचा महा मेळावा घेतला जात आहे. महा मेळाव्याच्या माध्यमातून वंचित, गरजू घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचवा. तालुका विधी सेवा समित्या व वरिष्ठ वकीलांनी या साठी पुढे यावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी केले. ते यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आर्णी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित जवळा (ता. आर्णी) येथील महामेळावा कार्यक्रमात बोलत होते. 

महा मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर (यवतमाळ) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उच्च न्यायालय विधी सेवा समिती नागपूर चे सचिव अनिलकुमार शर्मा, यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार, आर्णी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश व्ही. एम. धोंगडे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन व आर्णी तालुका वकील संघाचे अध्यक्ष दुर्गादास राठोड आदी उपस्थित होते. 

न्यायमुर्ती अविनाश घरोटे पुढे म्हणाले की, विविध घटकांसाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. नागरिकांनी देखील योजना समजून घेतल्या पाहीजे. नागरिकांच्या समस्याचे समाधान, तक्रारीचे निराकरण करण्यासाठी विधी सेवा समितीच्या वतीने जनजागृती केली जाते. न्यायालयाकडून मोफत कायदेशीर मदत व सेवा दिली जाते. या साठी जिल्हा प्रशासनाचे कार्य देखील कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. 

यवतमाळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर  यांनी सर्वांना न्याय, लाभ मिळावा, लाभ सुलभ व्हावे या साठी महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासकीय योजनांची माहिती गांव पातळीवर पोहचविण्यासाठी न्यायपालीकेचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, आर्णी पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here