सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानियांनी बीडमध्ये पुन्हा मस्साजोग हत्त्याकांड घडल्याबद्दल संताप व्यक्त करीत अश्रू ढाळलेत. त्या एक स्त्री कार्यकर्त्या जीवंत मन. जीवंत माणुसकी असलेल्या कुण्या शिक्षकाने म्हणे, श्रावणी बाळला पत्र लिहीत आत्महत्या केली. जगणं मुश्कील केलं म्हणून झालेली ही आत्महत्या हाही खूनच. अठरा वर्ष पगाराविना राहिलेला शिक्षकी पेशा पत्करलेला. त्याने जीव सोडला. तू एकदाचा मर म्हणजे तू ही सुटशील अन् आम्हीही असे म्हणणारे संस्था चालक. साराच मन सुन्न करणारा प्रकार.

तिकडे जनतेवर पैशांचा बोजा नको म्हणून कृषी मंत्री कोकाटे यांना शिक्षा माफ करणारे न्यायाधीश. तर बीडच्या निलंबित पोलिस अधिकाऱ्यांसमवेत होळीचा आनंद साजरा करणारे दुसरे न्यायाधीश. इकडे औरंगजेबाची कबर उखडणारे राजकारण. त्याला खत पाणी घालणारे आणि विरोध करणारे. मट्या खटक्याचे की हलालचे खावे हे सांगत सुटलेले मंत्री महोदय नीतेश राणे. पुन्हा मराठवाड्यातील खून प्रकरण तीन महिने लावून धरणारे आमदार धस यांचा चेला सतीश भोसले (खोक्या) चे वनजमीनीवरचे घर बुलडोझरने पाडणारे पोलीस पारध्यांची वस्ती पेटवून देत त्यांना उघडे पाडणारी राज्याची यंत्रणा.
बीडमध्ये पोलीसांची जात काढून टाकत पोलीस हा केवळ पोलीस वाटला पाहिजे म्हणणारे एस.पी. नवनीत. सरपंचाच्या खून प्रकरणी वाल्मीक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे वागणे आणि त्यांच्यावर झालेले आरोप या कथित आरोपींच्या बचावार्थ धावलेले नामदेव शास्त्री बोवा अन् दिंडोरी आश्रमाचे कुणी मोरेदादा आता उसळलेली धर्मांधता तोंडात मिळाची गुळणी धरून बसलेले अण्णा हजारे, देशाची विद्वान सुप्रिम न्यायसत्ता, पुन्हा दोन-पाच – आमदार वाढवणारी निवडणूक हे आजच्या महाराष्ट्राचे चित्र. राज्य – आणि देश कुठे नेवून ठेवला जातो याचे कुणाला सोयरसुतक नाही. नोकरशाही सारीच चोर नसली तरी – काही महाभाग रोज पदाचा गैरवापर करत पैसा खाणार, पकडले गेले तरी – सरकारी नोकरीवर येणार, कोर्टातून – निर्दोष सुटणार, खाल्ला त्यापैकी – काही पैसा वाटणार; राज्यात चोर – आम्ही, पोलीस आम्ही, वकीलही – आम्ही. न्यायाधीशही आम्हीच; – जसे चित्रपटात हिरो, व्हिलन, नाचगाणी करणारे एक्स्ट्रा कलाकार हे सारे एकाच खिडकीतुन त्यांचा मेहनताना घेतात तसेच हे आहे.
कुणी पोलीस तक्रार नोंदवून घेत नाही, तक्रार आल्याशिवाय कारवाई करीत नाही, कुणी न्यायाधीश मंत्र्याला भ्रष्टाचाराबद्दल खटला आला म्हणून दोषी ठरवत नाही, दोषी ठरवलाच तर २०२५ मध्ये ही १८६० च्या ब्रिटीश कायद्यान्वये कमीत कमी म्हणजे २ वर्षाची शिक्षा फर्मावतो, खालचे कोर्ट शिक्षा ठोठावते ती शिक्षा वचने हायकोर्ट सुप्रिम कोर्ट म्हणे रद्द करते, कमी करते हा खेळ देशभर चालतो बीड, मराठवाडा, खान्देश, साऱ्या महाराष्ट्रात हेच चालते, असे १५ कोटी लोक म्हणतात. मंत्री, आमदारांची संख्या कमी करावी,
विधानसभा असतांना विधान परिषद नसावी असे कुणी म्हणत नाही, शिक्षक आमदार असतांना विधानपरिषद शिक्षक नेमण्यासाठी २० लाख ३० लाख शिक्षण चालक उकळतात हे महाराष्ट्र जाणतो तरी शिक्षक आमदार झोडपला जात नाही, नष्ट केला जात नाही उलट त्याला खोगीर भरती करीता पाठींबा उकळळा जातो. या अत्याचाराविरुध्द आवाज उठवणारा कुणी अण्णा विकत घेतला जातो किंवा त्याचा आवाज बंद केला जातो. एखादी दमानिया अश्रू ढाळते, संतापाने बेकाम होते पण ती ही आर. एस.एस., भाजपा, फडणवीसांपुढे फीकी-फिकी पडते. तिच्या पूर्वाश्रमाची आठवण करून देत म्हणे विरोधकांना झोडपण्यासाठी वापर होतो. पण तिची आजची दिसणारी तळमळ कोण समजणार किती काळ हे चालणार? किती वेळ रडणार? असे म्हणतात की, मुक्या बहिऱ्यांपुढे ओरडणे, रडणे, गायन, संताप व्यर्थ ठरतो. झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही. कुण्या विद्वानाने म्हटले फिटेस्ट बुईल सर्वाईव्ह. म्हणजे जे सशक्त असतील तेच जगतील. तेच आज राज्यात चालते आहे. नाही कां ?