मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणी इलेक्ट्रॉनिक मिडीयामधे सुरु असलेल्या मिडीया ट्रायलवर उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली आहे. या मीडियावर शासनाचे नियंत्रण का असू नये, असा प्रश्न उपस्थित करण्य़ात आला आहे. मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर काही याचिकांवर आज सुनावणीच्या वेळी त्यांनी ही टिप्पणी केली.
सुशांतच्या मृत्यूशी संबंधित विविध मागण्यांसोबत प्रसारमाध्यमांना संयम ठेवण्यास सांगण्याची मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सूचना व प्रसारण मंत्रालयाला देखील पक्षकार केले आहे. एखादे वृत्त प्रसारित करण्य़ाबाबत कोणत्या पातळीपर्यंत शासनाचे नियंत्रण असते याचे उत्तर मागवण्यात आले आहे. न्यायालयाने एनसीबी व ईडीला देखील पक्षकार केले आहे.
तपास यंत्रणा तपासाची माहिती लीक करत असल्याचा आरोप एका याचिकाकर्त्याने केला आहे. असे असले तरी न्यायालयाने रिया चक्रवर्तीला प्रतिवादी करण्य़ास नकार दिला आहे. तिला प्रतिवादी करण्याचे कारण आम्हाला दिसत नसल्याचे न्यायाधिशांनी म्हटले आहे. काही सामाजिक कार्यकर्ते व आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या याचिक दाखल केल्या आहेत.