मुंबई : रस्ते अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार होण्यासाठी बाळासाहेब ठाकरेअपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली आहे. राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकाळातील या योजनेला आता पाच वर्षांनी मंजुरी मिळाली आहे.
अपघातग्रस्त व्यक्तीला विनाविलंब उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. त्याच्या अपघाताचा खर्च त्याला मिळाल्यास त्याच्या दुख़ा:ची तिव्रता कमी होते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना विम्याचा लाभ देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला ३0 हजार रुपयापर्यंतचा वैद्यकीय उपचाराचा खर्च महाराष्ट्र सरकारकडून मोफत केला जाणार आहे. या योजनेतून देशातील कुठल्याही नागरिकाला राज्यात अपघात झाल्यास मदत मिळेल.
तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सन २०१५ च्या अखेरीस बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची जाहीर घोषणा केली होती. या योजनेत 74 विविध अपघाताचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 125 कोटी खर्च अपेक्षित आहे.