निर्वस्त्र अंग चोळण्यासाठी हुसेन करायचा सक्ती — कु-हाडीच्या घावात हजराबाईने दाखवली स्त्री-शक्ती

On: October 4, 2025 4:50 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): “साठी बुद्धी नाठी” अशी मराठीत एक म्हण आहे. वयाच्या साठी नंतर कित्येक जण विचित्र वागतात अथवा बोलतात. “साठी” ओलांडलेल्या काही व्यक्तींच्या विचित्र वागण्यामुळे कित्येकदा त्यांच्या नातेवाईकांना लाजेने खाली मान घालावी लागते. अशा साठीपार लोकांच्या विचित्र वागण्यामुळे त्यांची पत्नी, मुले-मुली व सुना यांना प्रकर्षाने त्रास सहन करावा लागतो. अशा व्यक्तींच्या मुला मुलींचे विवाह जुळण्यास कित्येकदा अडचणी देखील येतात. “साठी बुद्धी नाठी” प्रकारात मोडणा-या लोकांसोबत त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांच्यासोबत फारसे संबध देखील ठेवत नाहीत. असे लोक टिकेचे धनी होतात. याचे कारण म्हणजे त्यांचे साठी नंतरचे कर्मचाळे जवळच्या लोकांना माहित असतात.

जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील निंभोरा या गावी हुसेन रसुल तडवी हा साठी ओलांडलेला इसम आपल्या परिवारासह रहात होता. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिपायाची नोकरी पुर्ण केल्यानंतर हुसेन हा सुमारे चार वर्षापुर्वी सेवानिवृत्त झाला होता. तिन मुली, एक मुलगा आणि पत्नी हजराबाई असा हुसेन तडवी याचा प्रपंच होता. निंभोरा गावातील गणेश कॉलनी भागात तो परिवारासह रहात होता. त्याची पत्नी हजराबाई ही निंभोरा ग्रामपंचायतीची माजी सदस्य होती.

हजराबाई लहान असतांनाच तिच्या नशिबी दुखा:चा डोंगर उभा होता. ती लहान असतांनाच तिचे मातृ पितृ छत्र हरपले होते. आईबापाच्या कृपाछत्राला पारखी झालेल्या हजराबाईच्या आजी आजोबांनी तिचे लग्न रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील रहिवासी असलेल्या हुसेन तडवी याच्यासोबत लावून दिले होते. तिच्या माहेरची बाजू कमकुवत असल्यामुळे हुसेन तडवी तिच्यावर आपला रुबाब आणि अधिकार गाजवण्याची संधी सोडत नव्हता. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होता. आई बापच्या प्रेमाला आणि कृपाछत्राला पारखी असलेली हजराबाई पती हुसेनचे वर्चस्व मुकाट्याने सहन करत होती. तिच्यापुढे अन्याय सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काही दिवसांनी नोकरीनिमीत्त हुसेन आणि हजराबाई हे दाम्पत्य निंभोरा या गावी स्वत:च्या घरात राहण्यास आले.    

सुमारे चार वर्षापुर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिपाई पदावरुन  सेवानिवृत्त झालेल्या साठीपार हुसेनची त्याच्या पत्नीला छळण्याची एक विचित्र खोड होती. पत्नी हजराबाईचा विचित्र पद्धतीने छळ केला म्हणजे त्यात त्याला सुख मिळत होते. तो दररोज रात्री त्याच्या अंगावरील संपुर्ण कपडे काढून निर्वस्त्र होत असे. आपल्या निर्वस्त्र अंगाला पत्नी हजराबाईकडून तो चोळून घेत होता. हजराबाईने संपुर्ण जोर लावून आपल्या अंगाची मालीश करावी अशी त्याची अपेक्षा रहात होती. त्यात जराही खंड पडलेला त्याला चालत नव्हता. आपल्या निर्वस्त्र अंगाची मालिश केल्यानंतर देखील त्याचे पुर्ण समाधान होत नसे. त्याचे समाधान होत नसल्यामुळे तो पत्नी हजराबाईला काठीने बदडून काढत होता.

पत्नी हाजराबाईला बदडून काढण्यासाठी त्याने घराच्या प्रत्येक कोप-यात एक काठी ठेवली होती. त्या काठ्यांच्या धाकावर तो हजराबाईकडून वेळेवर स्वयंपाक करुन घेत असे. वेळेवर त्याला जेवण मिळाले नाही, वेळेवर मनाप्रमाणे जोरजोरात निर्वस्त्र अंग चोळून झाले नाही तर तो हजराबाईला अक्षरश: झोडपून काढत असे. त्याची ही विचीत्र खोड अर्थात विकृती त्याच्या मुलींना देखील माहित झाली होती.

हुसेनचे वागणे विचित्र होते. त्याच्या घरी कुणी जवळचे नातेवाईक आले म्हणजे तो त्यांना शिवीगाळ करत असे. त्यांचे हातपाय तोडण्याची त्यांना धमकी देत होता. त्यामुळे त्याच्या घरी कुणी येत नव्हते. त्याच्या धाकामुळे व भितीमुळे हजराबाई घराबाहेर देखील पाय ठेवत नव्हती. ती गुलामगिरीचे जीवन जगत होती. रात्र झाली म्हणजे हुसेनच्या अंगातील सैतान जागा होत असे. तो पत्नी हजराबाईकडून ती थकून जाईपर्यंत त्याचे निर्वस्त्र अंग मालिश करुन घेत असे. हा एक दिवसाचा प्रकार नव्हता. तो दररोजचा प्रकार झाला होता. त्याच्या या रोजच्या आणि नेहमीच्या त्रासाला हजराबाई पार वैतागून गेली होती. हजराबाईला चप्पल, टिकल्या, बांगड्या या आवश्यक वस्तू देखील तो आणून देत नव्हता. तो तिच्याकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघत होता आणि तिला मारहाण करत होता. केवळ मारहाणच नव्हे तर शिवीगाळ देखील करत होता. आज नाही तर उद्या हुसेनच्या वागण्यात बदल होईल आणि सुखाचे दिवस येतील या आशेवर हजराबाई जीवन जगत होती आणि आपल्या मुलांचे पालणपोषन करत होती.

हजराबाईला जवळचा कुणी नातेवाईक नसल्यामुळे ती जणू काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती. सावदा येथे राहणा-या आते सासूला हजराबाईचे दुख: बघवले गेले नाही. त्यामुळे तिने हजराबाईच्या सर्वात मोठ्या मुलीचे लग्न सामुदायीक विवाह सोहळ्यात लावून दिले. तिची सर्वात मोठी मुलगी लग्नानंतर मुंबई येथे संसार करु लागली. काही काळानंतर हजराबाईची आते सासु मरण पावली. त्यानंतर हजराबाईच्या उर्वरित दोघा मुलींचे आणि एका मुलाचे लग्नकार्य राहूनच गेले. त्यांचे विवाहाचे वय निघून गेले.

हजराबाईची दुसरी 35 वर्ष वयाची मुलगी अपंग होती. हुसेनच्या विचित्र वागण्यामुळे तिचे लग्न जमवण्यास कुणीही नातेवाईक पुढाकार घेण्यास समोर येत नव्हते. तिसरी मुलगी सुमारे तिस वर्ष वयाची झाली होती. तिचे देखील लग्न जमले नाही. 28 वर्ष वयाचा मुलगा अपघातात मोठ्या प्रमाणात दृष्टी गमावून बसला. अपंग मुलीची फैजपूर येथील एका खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया झाली. एकंदरीत हुसेनच्या कर्माची फळे त्याचा परिवार भोगत होता असे म्हटले जात होते. “दुनिया मे कितना गम है …. मेरा गम कितना कम है” असे म्हणत हजराबाई दिवस कंठत होती. 

असे म्हणतात की मनुष्याचे जसे वय वाढते तसे त्याच्या अंगी प्रगल्भता येते. मात्र हुसेनच्या बाबतीत उलटेच होते. तो त्याच्या पत्नीसह मुलांना देखील मारझोड करत होता. त्याच्या वागण्यात कोणताही फरक पडत नव्हता. हुसेन त्याच्या निर्वस्त्र अंगाची मालीश पत्नी हजराबाईकडून सक्तीने करुन घेत होता. तिने जोर लावून आपल्या अंगाची तेलाने मालिश करावी अशी त्याची अपेक्षा रहात होती. मालिश करतांना हजराबाईचा जोर थोडाही कमी झाला म्हणजे हुसेनच्या रागाचा पारा सरकन वर चढत होता. तो लागलीच उठून तिला मारहाण करत होता. हा प्रकार गेल्या विस ते पंचविस वर्षापासून निरंतर सुरु होता. आपल्या मुलीसमोर हजराबाईला हा प्रकार करावा लागत होता. त्यामुळे लज्जेची देखील लाज गळून पडत होती. हा प्रकार बघून हजराबाईच्या मुलीला देखील कसेसे होत असे.

मुलींसमोर असले कृत्य योग्य नाही असे हजराबाई पती हुसेनला सांगण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तो ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत रहात नव्हता. निष्ठुर हुसेनला त्याचे काही सोयरसुतक नव्हते. तो आपल्या मुलींसमोरच हजराबाईचा शिवीगाळ, मारहाण करुन अपमान करत होता. प्रसंगी तो तिच्या अंगाला चटके देखील लावण्यास मागेपुढे बघत नव्हता. एवढे कमी झाले म्हणून की काय सकाळी अंघोळीच्या वेळी तो हजराबाईकडून त्याची पाठ देखील घासून घेत होता. हुसेन तडवी याने घरातील प्रत्येक कोप-यात एक एक काठी ठेवली होती. त्या काठीच्या धाकावर तो हजराबाईकडून अगदी वेळेवर स्वयंपाक करुन घेत होता. सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळचा स्वयंपाक वेळेवर झाला नाही तर काठी उगारण्यास तो अगदी तयारच रहात होता. कोणत्या जन्माचे दुख: आपल्या नशिबी आले असे हजराबाई स्वत:च्या मनाला विचारत होती.

अखेर हुसेनच्या जीवनातील तो अखेरचा दिवस आणि अखेरची घटीका हजराबाईच्या रुपाने काळ बनून त्याच्या अगदी समीप आली. 30 ऑगस्ट 2025 चा दिवस उजाडला. या दिवशी सकाळी आठ वाजता ठरल्यानुसार हजराबाईने पती हुसेन तडवी याला त्याचा नाश्ता करुन दिला. नाश्ता झाल्यानंतर लगेच त्याने तिला त्याचे अंग चोळून देण्याचे फर्मान सोडले. अजून माझा नाश्ता बाकी आहे तो झाला की लगेच तुमचे अंग चोळून देते असे हजराबाईने त्याला म्हटले. मात्र तिचे म्हणणे विचारात न घेता त्याने तिच्याकडून स्वत:चे अंग चोळूनच घेतले. अंग चोळून झाल्यानंतर काही वेळातच त्याने तिला जेवण मागितले. तिला मधुमेहासह रक्तदाबाचा त्रास होता. तसेच ती आजारी असतांना देखील तिने त्याची आज्ञा मानत त्याला पटकन स्वयंपाक करुन दिला. जेवण होताच त्याने पुन्हा एकवेळा तिला तेलाने अंगाची मालिश करण्याचे फर्मान सोडले. तशाही अवस्थेत तिने त्याचे अंग चोळून दिले.

सकाळी दोन वेळा अंग चोळून घेतल्यानंतर देखील त्याची रात्री अंग चोळून घेण्याची इच्छा कायम होती. सायंकाळी जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास हजराबाईकडून पुन्हा अंग चोळून घेण्यास त्याची इच्छा जागृत झाली. यावेळी त्याचा मुलगा गणपती मंडळाकडे गेला होता तर मुलगी ओट्यावर बसली होती. रात्रीचे नऊ वाजले होते. घराच्या मधल्या हजराबाई हुसेनच्या अंगाची मालिश करत होती. त्याचवेळी काही कारण नसतांना त्याने तिला लाथाबुक्कयांनी मारहाण सुरु केली. लग्न झाल्यापासून सुरु असलेली अश्लिल शिवीगाळ, बेदम मारहाण, पदोपदी अपमान या प्रकाराला हजराबाई पार वैतागली होती. आता मात्र तिच्या रागाचा पारा चढला. तिच्या अंगी असलेली रणरागीणी, महिशाशुर मर्दिनी जागृत झाली. तिला तिच्या अंगी असलेले स्त्री शक्तीचे रुप दाखवण्याची वेळ आली. तिने दरवाजात ठेवलेली कु-हाड हाती घेतली. लग्न झाल्यापासून तिच्या मनात साचलेला राग समुद्राच्या लाटेप्रमाणे उसळून आला. हाती घेतलेल्या कु-हाडीचा घाव तिने हुसेनच्या मानेवर, डोक्यावर, खांदयावर आणि कपाळावर जोरदार हल्ला केला. कु-हाडीच्या घावात हुसेनची हिटलरशाही कायमची बंद झाली आणि तो जागीच ठार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पालथ्या अवस्थेत तो जागीच मरण पावला.

पती हुसेनला ठार केल्यानंतर ती रणरागिणीप्रमाणे घराच्या बाहेर विजयी मुद्रेने ओरडत ओट्यावर आली. मी त्याला मारुन टाकले. मेला तो कु-हाडीच्या घावात. आज माझी लंगडी पोरगी आणि मी दोघी जणी त्याच्या त्रासापासून मुक्त झाल्या आहेत. मी आज शेवटी त्याला मारले असे ती सर्वांना ओरडून सांगू लागली. पतीला ठार केल्याचे ती जाहीर समर्थन आणि खुलासा करत होती. पती हुसेनला ठार केल्याचे तिच्या मनावर आणि चेह-यावर जराही दुख: नव्हते. उलट तिच्या मनावरील दडपण एका झटक्यात कमी झाले होते. तिच्या चेह-यावर समाधानाची लकेर पसरली होती.

या घटनेची गोपनीय माहिती निंभोरा बिट अंमलदार पोलिस नाईक अविनाश पाटील यांना एका जागरुक नागरिकाने दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक अभय ढाकणे, पोलिस उप निरीक्षक दिपाली पाटील, हे.कॉ. सुरेश अढायगे, पोलिस नाईक सुरेश पवार, अविनाश पाटील,  पो.कॉ. किरण जाधव, अमोल वाघ आदींनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळ असलेल्या घराच्या बाहेर हजराबाई जोरजोरात ओरडून जगाला आपले खूनी कृत्य सांगत होती. सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांनी आपल्या सहका-यांसह घरात जावून पाहिले असता हजराबाईचा पती हुसेन तडवी हा रक्ताच्या थारोळ्यात पालथ्या अवस्थेत पडलेला होता.

घटनास्थळ पंचनामा, मृतदेहाचा पंचनामा, मृतदेहाची उत्तरीय तपासणी आदी कायदेशीर सोपास्कार पार पाडण्यात आले. हजराबाईला ताब्यात घेतल्यानंतर सरकारतर्फे फिर्यादी होत पोलिस उप निरीक्षक दिपाली पाटील यांनी हजराबाई हुसेन तडवी हिच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा रजिस्टर क्रमांक 158/25 भारतीय न्याय संहिता 103 (1) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीसह सर्व कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर संशयीत महिला हजराबाई तडवी हिला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप अधिक्षक अनिल बडगुजर व सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अभय.एम. ढाकणे करत आहेत. त्यांना पोलिस उप निरीक्षक दिपाली पाटील, हे.कॉ. सुरेश अढायगे, पोलिस नाईक सुरेश पवार, अविनाश पाटील,  पो.कॉ. किरण जाधव, अमोल वाघ आदींचे सहकार्य लाभत आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment