मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सद्यस्थितीत मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टन्स आवश्यक करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी देखील मनसेप्रमुख राज ठाकरे कित्येक वेळा मास्क विना प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी मास्क न घातल्याचा फटका मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बसल्याचे म्हटले जात आहे.
राज ठाकरे आपल्या परिवारासह शुक्रवारी मुंबई येथून अलिबागला जाण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने ते प्रवास करत होते. रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान न करण्यासह मास्क परिधान करण्याच्या सुचना वेळोवेळी उदघोषणेच्या माध्यमातून दिल्या जात होत्या.
मात्र राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्कविनाच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेट देखील ओढल्याचे सांगण्यात येते. या प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना नियमांबाबत माहिती दिली. आपली चूक लक्षात आल्यानंतर राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच सार्वजनिक जागी मास्क परिधान केला नाही म्हणून १००० रुपयांचा दंड देखील जमा केला असल्याची माहीती पुढे आली आहे.
यापुर्वी कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी मान्यवर मंत्र्यांसह मंत्रालयात राज ठाकरे देखील हजर होते. यावेळी राज ठाकरे वगळता सर्वांनीच मास्क लावले होते. तुम्ही फेस मास्क का लावला नाही, असा प्रश्न त्यावेळी त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर तुम्ही सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही असे उत्तर त्यांनी दिले होते.
काही दिवसांपुर्वी वरळीतील नागरिकांनी राज ठाकरे यांचे कृष्णकुंज या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मनसे पक्षात प्रवेश करण्यासाठी ती गर्दी जमली होती. मुंबईत जमावबंदीचे आदेश असताना एकाच ठिकाणी एवढे लोक कसे आले याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.