खामगाव : स्वत:च्या मुलीचा वाईट उद्देशाने विनयभंग केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील माक्ता येथील नराधम बापाला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
खामगाव तालुक्यातील माक्ता येथील १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी ११ जून २०१८ रोजी घरात झोपली होती. रात्री १ वाजता तिच्या नराधम बापाने वाईट उद्देशाने तिचा विनयभंग केला. याशिवाय तिला शिवीगाळ करत मारहाण केली होती.
याप्रकरणी मुलीने १३ जून २०१८ रोजी ग्रामीण पोलिस स्टेशनला आपल्या बापाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध भा.दं.वि.च्या विविध कलमासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. तपास केल्यानंतर पोलिस उप निरिक्षक बालाजी महाजन यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
न्यायालयाने एकुण ९ साक्षीदार या गुन्ह्यात तपासले. त्यात मुलीची साक्ष ग्राह्य धरत न्या. आर.डी. देशपांडे यांनी नराधम आरोपी बापाला वेगवेगळ्या गुन्ह्यात ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाकडून अॅड. रजनी बावस्कार यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.