जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : पहाटेची वेळ… जुलै महिन्याची एक शांत सकाळ…रावेर तालुक्यातील नांदुरखेडा शिवारात शेतकरी रोजप्रमाणे आपल्या कामासाठी कपाशीच्या शेतात पोहोचले. मात्र त्या दिवशी त्यांच्या नजरेसमोर आलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते. हिरव्यागार कपाशीच्या झाडांमध्ये एका तरुणाचा निर्जीव देह पडलेला होता. क्षणातच गावात खळबळ उडाली. पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेहाची ओळख ऐनपूर येथील तिस वर्षीय शेख कुर्बान शेख शब्बीर अशी पटली.

सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू आहे की अपघात, याबाबत संभ्रम होता. मात्र शवविच्छेदन अहवालाने संपूर्ण तपासाची दिशा बदलली. गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट होताच रावेर पोलिसांसमोर एकच प्रश्न उभा राहिला—”शेख कुर्बानचा जीव नेमका कुणी आणि का घेतला?” याच प्रश्नाचा शोध घेताना रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासमोर उलगडली एक अशी कहाणी, ज्यात प्रेम, विश्वासघात, संशय, सूड आणि थंड डोक्याने रचलेले कटकारस्थान दडले होते.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2026 मध्ये शेख कुर्बान यांच्या आईवर शस्त्रक्रिया झाली होती. वैद्यकीय उपचारानिमीत्त कुर्बान आणि त्याची आई काही दिवस भोर या गावी मुक्कामी होते. याच काळात, घरात शेख कुर्बान नसल्याची संधी साधत गणेश घोरपडे हा कथितरित्या ऐनपूर येथे त्यांच्या घरी गेला आणि त्याने शेख कुर्बान याच्या पत्नीची भेट घेतली. बंद खोलीत सुरु असलेला गावकऱ्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. काहीतरी गडबड असल्याचा संशय गावक-यांना आला. गावक-यांनी गणेशला रंगेहाथ पकडून त्याला मारहाण केली. या घटनेची माहिती शेख कुर्बान आणि त्यांच्या आईपर्यंत गेली. त्यामुळे कुर्बान याने गणेश घोरपडे याला जाब विचारला. वास्तविक कुर्बान आणि गणेश हे दोघे मित्र होते. मात्र मैत्रीचा गैरफायदा घेत गणेशने वाईट हेतू मनात ठेवत त्याच्या पत्नीची भेट घेतली होती. या कारणावरुन दोघा मित्रांमधे तीव्र वाद झाला आणि याच घटनेतून पुढील संघर्षाची ठिणगी पडली.

पोलिस तपासानुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश घोरपडे याचे मृतक शेख कुर्बान यांच्या पत्नीशी कथित अनैतिक संबंध होते. हे संबंध काही काळापासून सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली. परंतु प्रत्येक गुपिताचा एक दिवस पडदा फाटतोच…तपासानुसार, एका दिवशी शेख कुर्बान यांनी पत्नी आणि गणेश घोरपडे यांना कथितरित्या रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला.

या घटने नंतर शेख कुर्बान याने त्याच्या पत्नीला तिच्या माहेरी सोडले. मात्र वाद तिथेच संपला नाही. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर गणेश घोरपडे याने शेख कुर्बान यास धमकी दिली. “तुझी पत्नी माझ्यावर प्रेम करते… तु जर मध्ये आलास तर तुला संपवून टाकीन.” त्या वेळी ही धमकी रागाच्या भरात दिलेली असेल, असे शेख कुर्बान यास वाटले असावे. पण पुढे घडलेल्या घटनांनी त्या शब्दांचे भयावह वास्तव समोर आले.

दिनांक 9 जुलै ची ती रात्र शेख कुर्बान याच्यासाठी काळरात्र ठरली. हमाली काम आटोपून शेख कुर्बान एकटाच घरी जात होता. तो एकटा असल्याचा क्षण गणेश घोरपडे आणि त्याचा साथीदार मेघराज सांगळे यांनी टिपला. त्यांनी त्याला सोबत घेतले आणि त्याच्यासमोर मद्यपानाचा आस्वाद घेण्याचा प्रस्ताव ठेवला. विश्वासातील मित्र असल्याचा आव आणत दोघांनी शेख कुर्बान यांना मद्यपानासाठी प्रवृत्त केले.


एक पेग…मग दुसरा…आणि पुन्हा पुन्हा दारू…काही वेळातच शेख कुर्बान याची प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली. दोघे संशयीत आरोपी याच क्षणाची वाट पाहत होते. तपासानुसार, दोघांनी शेख कुर्बान यास नांदुरखेडा शिवारातील निर्जन भागात नेले. तेथे त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह कपाशीच्या शेतात फेकून दोघे संशयीत आरोपी पसार झाले. त्यांना कदाचित वाटले असेल की हा गुन्हा कायमचा दडपला जाईल. पण प्रत्येक गुन्हा एखादा ठसा मागे ठेवूनच जातो.

दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळताच रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला संशयास्पद मृत्यू म्हणून तपास सुरू झाला. मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि तपासाचा केंद्रबिंदू खूनाकडे वळला. त्यानंतर रावेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला.
मृतकाच्या शेवटच्या हालचाली…मोबाईल कॉल डिटेल्स…मित्रपरिवार…नातेवाईक…घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा…सर्व बाबींची बारकाईने छाननी करण्यात आली. तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी संशयाची सुई गणेश घोरपडे आणि त्याचा साथीदार मेघराज सांगळे यांच्याकडे वळू लागली. पोलिसांनी दोन्ही संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मेघराज सांगळे याला रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मध्य प्रदेशात फरार झालेल्या गणेश घोरपडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. मृतकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात दाखल खूनाच्या गुन्ह्याच्या तपासाने भरीव प्रगती केली.

प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना मानली जाते. परंतु त्यात विश्वासघात, स्वार्थ, मालकीची भावना आणि सूड यांचा प्रवेश झाला, की त्याच प्रेमाचे रूप किती भयावह होऊ शकते, याचे हे प्रकरण धक्कादायक उदाहरण ठरते. पोलिस तपासानुसार, एका कथित अनैतिक संबंधामुळे एका तरुणाचा जीव गेला, अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले.


प्रत्येक वैवाहिक किंवा वैयक्तिक वादाचा शेवट हिंसेत व्हायलाच हवा असे नाही. संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर मार्ग हेच मतभेद सोडवण्याचे योग्य पर्याय आहेत. कारण विश्वास तुटला की नाती तुटतात… पण जेव्हा विवेक तुटतो, तेव्हा जन्म होतो तो गुन्ह्याचा.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत, डिवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन, पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील, हे.कॉ. नितीन आमोदकर, विजय चौधरी, पो.कॉ. रुबाब तडवी, मुकेश तडवी, पो.कॉ. विशाल पाटील, प्रमोद पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला.






