जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): भुसावळ शहर हे रेल्वेचे जंक्शन स्टेशन म्हणून ओळखले जाते. या शहराची अर्थव्यवस्था एक प्रकारे रेल्वेवर अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. रेल्वेमुळे जरी भुसावळ शहराची अर्थव्यवस्था मजबूत झाली असली तरी याच रेल्वे मुळे या शहराची गुन्हेगारी देखील वाढली आहे असे म्हणता येते. याचे कारण म्हणजे या शहरात रेल्वेचे मोठे यार्ड आहे. या रेल्वे स्टेशनवर देशाच्या विविध भागातून जाणा-या व येणा-या रेल्वे गाड्या थांबतात. त्यामुळे हे शहर म्हणजे गुन्हेगारांचे एक अलिखीत आश्रयस्थान म्हटले जाते. तसेच या शहराच्या परिसरात रेल्वेचे सामान पडलेले आणि विखुरलेले असते. या रेल्वे सामानाची व भंगाराची चोरी गुन्हेगार करतात. हे चोरीचे भंगार विकून मिळालेल्या पैशातून गुन्हेगार आपले व्यसन पुर्ण करतात. त्यातून गुन्हेगारी बोकाळते. रेल्वेचे भंगार, कोळसा आणी विविध वस्तू चोरुन त्या विकून गुन्हेगारीचा जन्म होतो. अशाच गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी एका पुजा-याची हत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

दिनांक 28 जून 2026 च्या रात्री भुसावळ शहराच्या झेडटीसी परिसरात रेल्वे रुळालगत कालीका माता मंदिरात राहणाऱ्या 55 वर्षीय संतोष मनचल या सेवेकऱ्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. सुरुवातीला हा अपघात, व्यसनाधीन व्यक्तींमधील वाद की नियोजित खून याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले. मृताच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि बरगड्यांवर झालेल्या गंभीर मारहाणीच्या खुणांनी मात्र पोलिसांना पहिल्याच क्षणी स्पष्ट संकेत दिला—ही नैसर्गिक किंवा अपघाती घटना नव्हती तर हा निर्दयी खून होता.
घटनास्थळ रेल्वे रुळालगतचे निर्जन ठिकाण. आजूबाजूला झुडपे, अंधार, रात्रीची वर्दळ कमी आणि परिसरात व्यसनाधीन तसेच भंगार चोरी करणाऱ्यांचा वावर. त्यामुळे तपासासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. परंतु अवघ्या काही तासांत पोलिसांनी या हत्येचा छडा लावत केवळ संशयीत आरोपींना अटकच केली नाही, तर गुन्ह्यामागील संपूर्ण कटही उघडकीस आणला.

मृत संतोष मनचल हे काही वर्षांपासून कालीका माता मंदिरात सेवेकरी म्हणून राहत होते. पूर्वी त्यांनी गॅरेज व्यवसाय केला होता. मात्र आर्थिक परिस्थिती, व्यसन आणि आयुष्यातील बदलांमुळे त्यांनी मंदिरात वास्तव्य स्वीकारले. त्यांचे कुटुंबीय अधूनमधून त्यांची भेट घेत असत. जेवणाचा डबा पोहोचवला जात असे. त्यांच्याशी कोणाचे उघड वैर नव्हते.

28 जूनच्या सायंकाळी ते मंदिराच्या ओट्यावर बसलेले काही जणांनी पाहिले. रात्री परिसर शांत झाला. रेल्वे रुळालगत अंधार पसरला. मंदिराजवळ काही संशयित युवक फिरत असल्याचे काहींनी पाहिले. मात्र त्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर परिसरात संतोष मनचल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. जबडा सुजलेला, बरगड्या मोडलेल्या, छातीवर आणि चेहऱ्यावर अमानुष मारहाणीच्या खुणा होत्या. प्राथमिकदृष्ट्या कोणीतरी लाकडी दांडा, बुक्के आणि लाथांनी बेदम मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत होते.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शंनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आणि परिसर सिल करण्यात आला. रक्ताचे नमुने जप्त करण्यात आले. पावलांचे ठसे शोधण्यात आले. परिसरातील रहिवाशांची चौकशी सुरू झाली. मृताच्या हालचालींचा शेवटचा मागोवा घेण्यात आला.

तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांना दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे हा मृत्यू अपघाती नसून हत्या आहे. दुसरी म्हणजे गुन्हा करणारे व्यक्ती परिसराशी परिचित आहेत. घटनास्थळी चोरीचा कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता. मृताजवळ मौल्यवान वस्तू नव्हत्या. त्यामुळे लूट हा हेतू नसल्याचे स्पष्ट झाले. परिसरातील काही नागरिकांनी रात्री काही युवक दिसल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या माहितीची पडताळणी सुरू केली. याचदरम्यान पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा गवसला.
रेल्वेचे लोखंडी साहित्य चोरी करून विकणाऱ्या टोळीबद्दल माहिती मिळाली. त्या टोळीतील काही युवक रात्री याच परिसरात सक्रिय असल्याचे उघड झाले. तपासात समोर आलेले चित्र धक्कादायक होते. रेल्वे रुळालगतच्या परिसरातून लोखंडी साहित्य चोरी करणे, ते भंगार विक्रेत्यांकडे विकणे आणि त्यातून मिळालेल्या पैशांत दारू व अमली पदार्थ घेणे हा काही युवकांचा रोजचा व्यवसाय बनला होता. त्या रात्रीही संशयीत आरोपी रेल्वेचे साहित्य चोरी करून परतत होते. मंदिराजवळ संतोष मनचल यांनी त्या तरुणांना हटकले. येथेच संपूर्ण घटनाक्रमाला रक्तरंजित वळण मिळाले.


तपासात आरोपींच्या कबुलीजबाबातून समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराजवळ काही कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच शिवीगाळीत बदलला. एका संशयीत आरोपीने संतापाच्या भरात संतोष मनचल यांना बुक्का मारला.दुसऱ्याने लाथा घालण्यास सुरुवात केली. तिसऱ्याने लाकडी दांड्याने वार केले. हल्ला एवढ्यावर थांबला नाही. संतोष मनचल जमिनीवर कोसळल्यानंतरही त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
संतोष मनचल यांचा चेहरा, छाती आणि बरगड्यांवर पुन्हा पुन्हा प्रहार करण्यात आले. काही मिनिटांतच ते गंभीर जखमी झाले. संशयीत आरोपी तथा हल्लेखोरांनी त्यांना तिथेच सोडून पळ काढला. त्यांना वाटले आपल्याला कुणीही पाहिले नाही. पण गुन्हेगार अनेकदा विसरतात की आपल्या पश्चात घटनास्थळ नेहमी बोलत असते. भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने तपासाची सुत्रे हाती घेतली. रेल्वे परिसरातील माहितीदार सक्रिय करण्यात आले. परिसरातील भंगार विक्रेत्यांची चौकशी झाली. रेल्वे साहित्य विक्रीची साखळी तपासण्यात आली.

कोणताही थेट पुरावा नसल्याने या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. दरम्यान गुन्ह्याच्या रात्री काही तरुणांनी रेल्वेचे लोखंड चोरुन ते एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचा सुगावा लागला. त्या भंगार व्यावसायिकाला चौकशीकामी ताब्यात घेत त्याच्याकडून माहिती संकलीत करण्यात आली. त्या भंगार व्यावसायीकाने दिलेल्या माहितीच्या आधारे हर्षल राजु वर्मा, क्षितीज संजय भालेराव आणि प्रफुल उत्तम जाधव या तिघांना ताब्यात घेण्यात आले.


सुरुवातीला तिघांनी आपला गुन्हा नाकारला. प्रत्येकाने वेगवेगळ्या कथा सांगितल्या. कोणी घरी असल्याचे सांगितले. कोणी मित्रांसोबत असल्याचे सांगितले. मात्र पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या अनुभवी नजरेने त्यांच्या जबाबातील विसंगती टिपल्या. सततच्या चौकशीत आरोपींची मानसिक पकड सैल होत गेली. रेल्वे भंगार विक्रीचे पुरावे त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. घटनास्थळावरील माहिती त्यांना सांगण्यात आली. शेवटी तिघा हल्लेखोर संशयीत आरोपींनी आपापल्या गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात उघड झाले की तिघे तरुण हे नियमितपणे रेल्वेचे साहित्य चोरत होते. भंगार विक्रीतून मिळणाऱ्या पैशांत ते आपले व्यसन पुर्ण करत होते. घटनेच्या रात्री चोरीनंतर ते मंदिराजवळ आले. तेथे मयत संतोष मनचल यांनी तिघांना हटकले. झालेल्या वादातून तिघा तरुणांचा संताप अनावर झाला. क्षणिक राग, व्यसनामुळे सुन्न झालेली मानसिकता आणि हिंसक प्रवृत्ती यामुळे त्यांनी पुजारी संतोष मनचल यांना अमानुष मारहाण केली.

एका क्षणाचा राग एका निष्पाप जीवाचा अंत ठरला. या तपासात घटनास्थळाचे वैज्ञानिक निरीक्षण, फॉरेन्सिक पथकाची मदत, स्थानिक बातमीदारांचे जाळे, भंगार विक्रेत्यांपर्यंत पोहोचलेली चौकशी, संशयितांची सातत्यपूर्ण कसून चौकशी, गुन्ह्याचा वेगवान तपास या सर्व बाबींचा समन्वय साधला गेला. या सर्वांच्या आधारे अवघ्या तीस तासांत गुन्ह्याचा उलगडा झाला.




अटकेतील तिघे तरुण बारावीपर्यंत शिकले आहेत. प्रफुल उत्तम जाधव हा पोलिस दलात दाखल होण्यासाठी तयारी करत होता. मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती मुळे तो खूनाच्या गुन्ह्यात अडकला. हर्षल राजू वर्मा याच्याविरुद्ध यापुर्वी अपहरण व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला बॉक्सींगची पार्श्वभुमी आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येची नाही. ती अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करते. रेल्वे मालमत्तेची चोरी, भंगाराच्या अवैध खरेदी-विक्रीचे जाळे, व्यसनाधीन तरुणांची वाढती संख्या, निर्जन भागांतील गुन्हेगारी, क्षणिक रागातून होणारे खून, समाजात हिंसेबद्दल वाढणारी असंवेदनशीलता असे विविध पैलू या घटनेमागे दडलेले आहेत.


जेव्हा चोरी सहज पैसा मिळवण्याचे साधन बनते, व्यसन जीवनाचा भाग बनते आणि हिंसा वाद मिटवण्याचा मार्ग बनते, तेव्हा अशा घटना अपरिहार्यपणे घडू लागतात. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची ठरली. घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा महत्त्वाचा मानण्यात आला. कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येक शक्यतेची तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपास, मानवी माहिती आणि वैज्ञानिक पुरावे यांची सांगड घालून तपास पुढे नेण्यात आला.
आजच्या आधुनिक गुन्हे तपासात केवळ कबुलीजबाब पुरेसा नसतो. पुरावे, परिस्थितीजन्य तथ्य, फॉरेन्सिक विश्लेषण आणि तपासातील सुसंगती यांवरच गुन्ह्याचा पाया उभा राहतो. या प्रकरणातही तेच दिसून आले. गुन्हे हे अचानक घडत नाहीत. ते अनेक सामाजिक विकृतींच्या साखळीतून जन्म घेतात. व्यसन, बेरोजगारी, बेकायदेशीर आर्थिक मार्ग, हिंसक स्वभाव आणि कायद्याबद्दलची भीती कमी होणे या सर्वांचा संगम झाला की समाजात अशा घटना घडतात.


कायद्याची भीती निर्माण करणे जितके आवश्यक आहे, तितकेच महत्त्वाचे आहे तरुणांना योग्य दिशा देणे. रेल्वेच्या मालमत्तेची चोरी हा केवळ आर्थिक गुन्हा नाही तर ती सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण करू शकते. त्याचप्रमाणे भंगाराची बेकायदेशीर खरेदी करणारे घटकही या साखळीतील महत्त्वाचा दुवा असतात.


संतोष मनचल यांचा मृत्यू हा एका व्यक्तीचा अंत असला, तरी तो समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. क्षणिक राग, व्यसन आणि गुन्हेगारी वृत्ती यांचा शेवट नेहमीच तुरुंगात किंवा स्मशानात होतो. कायद्याचे हात उशिरा पोहोचले तरी ते रिकामे परतत नाहीत. म्हणूनच अशा प्रत्येक घटनेतून समाजाने केवळ गुन्ह्याची कथा नव्हे, तर त्यामागील कारणे ओळखून त्यावर उपाय शोधणे हीच खरी सामूहिक जबाबदारी आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दुय्यम अधिकारी, अंमलदार, भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे.कॉ. संदिप पालवे, पो.कॉ. भुषण चौधरी, दिपक शेवरे, कुणाल सोनवणे, राहुल बेहेनवाल, राहुल भोई आदींनी पुर्ण केला.






