तिन दिवसांपासून तरुणाचा मृतदेह बंगल्यात ; पुण्यातील घटना

काल्पनिक छायाचित्र

पुणे : पुणे येथील सहकारनगर परिसरातील एका बंगल्यात मुलाचा मृतदेह मिळाला असून त्याची आई गंभीर जखमी व बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून आई जखमी तर मुलगा मयत अवस्थेत पडून असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पुणे येथील सहकार नगरातील शिरीष सोसायटी येथील बंगल्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. आशिर्वाद सदावर्ते (४२) असे मयत अवस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव असून त्याची ९० वर्षांची आई बेशुद्धावस्थेत सापडली आहे.

सहकारनगर भाग दोनमधील या बंगल्यातून उग्र दर्प येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी सदावर्ते यांच्या बहिणीला कळवली. त्यांनी पुण्यात राहणाऱ्या बहिणीला याची माहिती दिल्यानंतर तपास केला असता दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाला भेट दिली असता दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

तरुणाचा मृतदेह पलंगावर तर बेशुद्ध व जखमी अवस्थेतील आई बाथरुममध्ये आढळून आली. मयत तरुणाच्या जखमी आईला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्या मातेच्या पोटात अन्नाचा कण नसल्याचे आढळून आले. आशिर्वाद सदावर्ते याच्या मृत्युचे नेमके कारण समजले नाही. वैद्यकीय अधिका-यांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.

या बंगल्यात दोघे मायलेक राहत होते. आशिर्वाद या तरुणाचा विवाह झाला नव्हता. आशिर्वाद यास दारुचे व्यसन होते. आशिर्वाद सदावर्ते या तरुणाचा किमान तिन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा़ असा अंदाज आहे. त्यामुळे त्याच्या मृतदेहाचे विघटन सुरु झाले आहे. जखमी महिला माहिती देण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे माहिती समजू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here