सरपंचाचा गावात बियर बार, करतो गोळीबार! — दहशत माजवतांना विचार केला नाही सारासार!! 

On: August 28, 2026 2:25 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – रात्रीची वेळ… गावात सगळीकडे शांतता… आणि अचानक हवेत घुमला गोळीबाराचा आवाज!क्षणभरात गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. गोळीबार करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून गावचा विद्यमान सरपंच असल्याची माहिती समोर आल्यानंतर तर या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. ही घटना २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता यावल तालुक्यातील डांभुर्णी, ता. यावल येथे घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, डांभुर्णी येथील सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके गोडू याने गावातील एका ठिकाणी येऊन देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळीबाराची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळाची पाहणी केली असता, शिवमार्ट सोयाबीन बिर्याणीच्या दुकानाजवळ एक न फुटलेली जिवंत काडतूसासह गोळीबार करण्यात आलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी पोलिसांना मिळाली. एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या दुकानांमध्ये चौकशी करून घटनेची माहिती गोळा करण्यात आली. मोबाईल फोरेन्सिक व्हॅनच्या मदतीने घटनास्थळावरून पाचरण करून महत्त्वाचे भौतिक पुरावेही जप्त करण्यात आले.

पण पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता—गोळीबार केल्यानंतर आरोपी गेला कुठे? रात्रीची शोधमोहीम… आणि पहाटे एक मोठा ट्विस्ट! गोळीबारानंतर आरोपी जळगावच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस शिपाई सचिन पाटील यांच्यासह पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही स्वतंत्रपणे शोधमोहीम सुरू केली.

रात्र वाढत होती…गाव शांत होत होते…पण पोलिसांची आरोपीच्या शोधाची मोहीम सुरूच होती. आणि अखेर…रात्री सुमारे १ वाजता संशयीत आरोपी विकास उर्फ गोटू सोळंके पोलिसांच्या ताब्यात आला. जळगाव शहरातील कालंका मात मंदीर परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामागील कथित कारण समोर आले.

हॉटेलमधील ‘तो’ वाद… आणि मनात पेटलेली आग!

पोलिसांच्या चौकशीत संशयीत आरोपीने गावातील काही मुलांबाबत धक्कादायक माहिती दिल्याचे समोर आले. संशयीत आरोपीचे डांभुर्णी गावात आदर्श हॉटेल, बिअर बार आणि परमिट रूम असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. काही मुले त्याच्या हॉटेल-बिअर बारवर येऊन मोबाईलवर व्हिडीओ काढत असल्याने त्यांना त्रास होत होता, असा आरोप आहे.

दि. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या एका भांडणामुळे सरपंचाच्या मनात या मुलांबद्दल संताप निर्माण झाला होता. आणि दुसऱ्याच दिवशी…२७ ऑगस्टच्या रात्री त्याने धाक निर्माण करण्यासाठी बंदूक बाहेर काढल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्याने डांभुर्णी येथे येऊन देशी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला, अशी कबुली चौकशीदरम्यान दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

मात्र गोळीबार केल्यानंतर त्याने शस्त्र आपल्याजवळ ठेवले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयीत आरोपी तथा सरपंचाने गोळीबारासाठी वापरलेले पिस्तुल आणि एक जिवंत राऊंड डांभुर्णी गावाच्या शिवारातील एका हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला.

आणि अखेर…देशी पिस्तुल, मॅगझिनसह एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. एका बाजूला गावचा सरपंच… दुसऱ्या बाजूला देशी पिस्तुल…आणि मध्यरात्री जळगावातील कालंका माता मंदिराजवळ झालेली अटक…या संपूर्ण घटनाक्रमामुळे डांभुर्णी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 125 तसेच भारतीय हत्यार कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेहबूब सय्यद करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

एक गोळी हवेत झाडली… पण तिचा आवाज संपूर्ण गावाला हादरवून गेला! आता पोलिसांच्या तपासात गोळीबारामागील नेमका वाद काय होता, आरोपीकडे देशी पिस्तुल आले कुठून आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment