मद्यासह पत्त्यांच्या नाद, दुचाकी ठेवली गेली गहाण — करणसिंगला ठार करतांना मायलेकांची बुद्धी गहाण

On: August 14, 2026 2:30 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मोह हे दुखा:चे कारण असते. जुगार खेळण्याचा आणि मद्यपानाचा अती मोह मनुष्याला संकटात नेतो. हा मोह वाढत गेला म्हणजे मनुष्य एके दिवशी स्वत:सह परिवारावर देखील संकट ओढवून घेतो. जुगार आणि मद्याचा नाद पुर्ण झाला नाही म्हणजे त्याची सवय जडलेला मनुष्य चिडचिड करतो आणि वाद घालतो. विकोपाला गेलेल्या वादासह क्षणिक रागातून एखादा गुन्हा देखील घडतो. क्षणिक रागात घेतलेला निर्णय संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करून जातो. जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे घडलेली घटना याच कटू वास्तवाची साक्ष देणारी आहे. पत्त्याचा नाद आणि मद्यपानाची सवय जडल्याने गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी करणा-या कुटूंबप्रमुखाचा त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलाने खून केल्याची घटना घडली. पती पत्नीमधील वाद इतका टोकाला गेला की त्यात पतीचा जीवच गेला. या घटनेत खून झालेल्या इसमाची पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

करणसिंग रामसिंग वंजारी हा 45 वर्ष वयाचा इसम कधी शेतात तर कधी उसतोडीचे काम करुन आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. कालांतराने करणसिंग यास पत्त्याच्या आणी मद्याचा नाद जडला. हळूहळू हा नाद त्याला एवढा जडला की त्याचे संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. करणसिंग वंजारी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत त्याला जडलेल्या व्यसनामुळे घरात अनेकदा पैशांवरून वाद होत असत.

करणसिंग यास जडलेल्या पत्त्याचा आणि दारुच्या व्यसनामुळे त्याने तो रहात असलेल्या परिसरातील एका व्यक्तीकडे त्याची दुचाकी गहाण ठेवली. गहाण ठेवलेली मोटार सायकल सोडवण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याच्या व्यसनामुळे त्याला कुणी उधार पैसे देत नव्हते. दुचाकी तर सोडवायची आणि पैसे आणायचे कुठून असा त्याच्यासमोर पेच निर्माण झाला होता.

दुचाकी सोडवण्यासाठी त्याने पत्नी अरुणाबाई हिच्याकडे पैशांची मागणी केली. त्याच्या या मागणीला पत्नी अरुणाबाईने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. याच कारणावरुन घरात धुसफुस सुरु होती. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी हा वाद वाढतच गेला. दुपारच्या वेळी पुन्हा या कारणावरुन वादाने पेट घेतला. शब्दामागे शब्द वाढत होता आणि पती पत्नीत वादाची ठिणगी पडली. पती पत्नीतील वाद त्यांचा मुलगा उघड्या डोळ्याने बघण्याशिवाय काही करु शकत नव्हता.

सुरुवातीला हा नेहमीचा कौटुंबिक वाद असल्याचेच वाटत होते. मात्र, काही क्षणांत परिस्थिती हाताबाहेर गेली. आपल्या आईला होत असलेली शिवीगाळ आणि मारहाण अरुणाबाईच्या मुलाला बघवली गेली नाही. त्याचा राग आटोक्याबाहेर गेला. आपल्या आईला वाचवण्यासाठी त्याने घरात पडलेला सायकलमधे हवा भरण्याचा पंप उचलून बापाच्या डोक्यात हाणला.

श्रीकांत धीवरे पोलिस अधीक्षक

सायकलमधे हवा भरण्याचा पंप डोक्यावर आदळल्याने करणसिंग जमीनीवर पडला. क्षणभरातच घरातील परिस्थिती पूर्णपणे बदलली. करणसिंग खाली पडताच पतीच्या तडाख्यातून सुटका झालेल्या अरुणाबाईसह तिच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळण्यास सुरुवात केली. गळा आवळला गेल्याने करणसिंग यास श्वास घेणे जिकीरीचे झाले. त्याने पाय झाडण्यास सुरुवात केली. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले आणि करणसिंग याचा जागीच मृत्यु झाला.

गावचे पोलिस पाटील रमेश चरणसिंग राठोड यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घराची पाहणी केली असता त्याठिकाणी करणसिंग याच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळलेली आढळून आली. घराच्या छतावर त्यांनी पाहिले असता त्यांना त्याठिकाणी नायलॉनची दोरी टांगलेली अथवा बांधलेली आढळून आली नाही. याचा अर्थ करणसिंग याच्या गळ्याभोवती दोरी आवळून त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिस पाटील रमेश राठोड यांनी लागलीच या घटनेची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला कळवली.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव उप विभागाचे डिवायएसपी विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक राहुल राजपूत, हे.कॉ. संदीप माने, ओंकार सुतार, पो.कॉ. निवृत्ती चित्ते, किरण देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई आणि तपासाला सुरूवात केली. पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेहाची स्थिती, आजूबाजूची परिस्थिती आणि घरातील वस्तूंची पाहणी करण्यात आली. संशयास्पद बाबी आढळल्यानंतर पोलिस उप निरीक्षक राहुल राजपूत यांनी मयत करणसिंग याची पत्नी व मुलाची चौकशी सुरू केली. दरम्यान करणसिंग याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटने प्रकरणी पोलिस पाटील रमेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला माय लेकांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा मायलेकांनी आपला गुन्हा कबुल करत घटनाक्रम पोलिसांना कथन केला. मयत करणसिंग याची पत्नी अरुणाबाई हिस अटक करण्यात आली तर तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

या घटनेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आर्थिक अडचण. एका दुचाकीला गहाण ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली. ती दुचाकी सोडवण्यासाठी पुन्हा पैशांची गरज निर्माण झाली. घरातील आर्थिक परिस्थिती आधीच तणावपूर्ण असताना पैशांची मागणी, पतीचे व्यसन आणि वारंवार होणारे कौटुंबिक वाद या सर्वांचा परिणाम कुटुंबातील वातावरणावर होत असल्याचे एकंदरीत दिसून आले. आर्थिक ताण, व्यसन आणि संतापावर नियंत्रण नसणे यांची एकत्रित परिणती किती भयंकर होऊ शकते याचे हे प्रकरण उदाहरण ठरते.

कौटुंबिक वाद जवळपास प्रत्येक समाजात आढळतात. मतभेद होतात. पैशांवरून भांडणे होतात. व्यसनामुळे घरात तणाव निर्माण होतो. पण या सगळ्याला हिंसेची जोड मिळाली की परिस्थिती क्षणार्धात बदलते. करणसिंग वंजारी याच्या प्रकरणाची सुरुवात पैशांच्या मागणीपासून सुरु झाली आणि शेवट खूनात झाला. एका क्षणाचा संताप एका कुटुंबातील व्यक्तीचा जीव घेऊन गेला तर दुसरीकडे त्याच कुटुंबातील सदस्यांवर गंभीर गुन्ह्याचे आरोप आले.

या घटनेत सर्वाधिक मोठा प्रश्न असा आहे की, वाद थांबवण्यासाठी कोणीही त्या क्षणी पुढाकार घेतला असता तर हा मृत्यू टाळता आला असता का? या घटनेत अल्पवयीन मुलाचा सहभाग आल्याने आणखी एक गंभीर सामाजिक प्रश्न उपस्थित होतो.

घरातील सततचे भांडण, पैशांवरील संघर्ष, व्यसनाधीनता आणि हिंसक वातावरण यांचा मुलांच्या मानसिकतेवर खोल परिणाम होऊ शकतो. एखाद्या घरात हिंसा वारंवार घडत असेल, तर ती मुलांच्या दृष्टीने हळूहळू ‘सामान्य’ वाटू लागण्याचा धोका असतो. अल्पवयीन व्यक्तीवर कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्रपणे केली जाते. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजाने एका प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे—घरातील वातावरण मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर किती परिणाम करत असते?

व्यसन ही केवळ एका व्यक्तीची वैयक्तिक समस्या नसते. त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. कमावलेला पैसा व्यसनात खर्च होतो, घरातील गरजा अपुऱ्या राहतात, आर्थिक कर्ज वाढते, पती-पत्नीमध्ये वाद होतात आणि मुलांवर मानसिक ताण येतो. कधी कधी हा ताण हिंसेपर्यंत पोहोचतो. म्हणूनच व्यसनमुक्ती हा केवळ आरोग्याचा विषय नाही तर तो कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आणि समाजाच्या भवितव्याचा विषय आहे.

आंबेहोळमधील ही घटना केवळ एका कुटुंबातील दुर्दैवी घटना म्हणून पाहून थांबता येणार नाही. या घटनेतून समाजाने काही गंभीर धडे घेणे गरजेचे आहे. पैशांवरून होणारा वाद हिंसेपर्यंत जाऊ देऊ नका. आर्थिक अडचणी असतील तर कुटुंबीय, नातेवाईक, सामाजिक संस्था किंवा कायदेशीर मार्गदर्शनाची मदत घेता येते. पण हिंसा हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. व्यसनाला सुरुवातीलाच थांबवणे आवश्यक आहे. दारू, जुगार किंवा इतर व्यसनांमुळे घरात वारंवार वाद होत असतील तर समस्या दुर्लक्षित न करता मदत घेणे गरजेचे आहे. मुलांसमोर होणाऱ्या कौटुंबिक हिंसेकडे दुर्लक्ष करू नका. घरातील भांडणांचा मुलांवर होणारा परिणाम अनेकदा आयुष्यभर राहू शकतो. रागाच्या क्षणी निर्णय घेऊ नका. राग काही मिनिटांचा असतो. परंतु त्यातून होणारा परिणाम संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हिंसेची चिन्हे दिसत असतील तर शांत बसू नका. शेजारी, नातेवाईक किंवा मित्रांच्या घरात वारंवार हिंसक वाद होत असतील तर योग्य पद्धतीने हस्तक्षेप करणे आणि आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे.

या घटनेने एक कटू सत्य समोर आणले आहे. घरात सुरू झालेला छोटासा वाद जर वेळेवर थांबवला नाही, तर तो संपूर्ण कुटुंबाचा विनाश करू शकतो. गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरून सुरू झालेला वाद अखेर एका व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत पोहोचला. एका कुटुंबातील सदस्यांवर खूनाचे आरोप आले.  एका अल्पवयीन मुलाचे आयुष्य कायदेशीर प्रक्रियेत अडकले आणि कुटुंबाची दिशाच बदलली. म्हणूनच या घटनेचा सर्वात मोठा संदेश एकच आहे. “वाद जिंकण्यापेक्षा नाते वाचवणे महत्त्वाचे आणि राग व्यक्त करण्यापेक्षा तो आवरणे अधिक महत्त्वाचे.” कारण रागाच्या भरात उच्चारलेले शब्द कदाचित परत घेता येतील. पण रागाच्या भरात घडलेली हिंसा आणि त्यातून गेलेला जीव कधीच परत आणता येत नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment