नवी दिल्ली : एकेकाळी उद्योग जगतातील आघाडीचे नाव असलेले अनिल अंबानी सध्या आर्थिक अडचणींचा मुकाबला करत आहेत. अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून न्यायालयीन कामकाजासाठी त्यांच्यावर दागिने विकण्याची वेळ आली आहे. कर्जाच्या दडपणाखाली असलेले उद्योजक अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधील न्यायालयात ही माहिती दिली आहे.
अंबानी यांनी चीनमधील तीन बॅंकांकडून 4 हजार 760 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरुद्ध दावा दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अनिल अंबानी यांनी सद्यस्थितीतील आर्थिक परिस्थितीची माहिती न्यायालयाला दिली आहे. अनिल अंबानी यांनी न्यायालयाला सांगितले की मी एक सर्वसामान्य जीवन जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे. गेल्या सहा महिन्यात पत्नीचे 9 कोटी 90 लाख रुपयांचे दागिने विकले असून आता जवळ किमती ऐवज राहिलेला नाही.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनिल अंबानी शुक्रवारी लंडनमधील उच्च न्यायालयासमोर उपस्थित राहिले. सुमारे तीन तास त्यांची प्रश्न उत्तरे सुरु होती. संपत्ती, कर्जदार आणि खर्चांबाबतचा तपशील त्यांना विचारण्यात आला. न्यायालयात माहिती देतांना त्यांनी सांगीतले की माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या असून माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान कार नव्हती. आता देखील केवळ एकच कार आपल्या सोबत असल्याचे अनिल अंबानी यांनी न्यायालयास सांगितले.
मध्यंतरीच्य काळात एरिक्सन या स्वीडिश टेलिकॉम कंपनीचे ६० दशलक्ष पौंडा देणे होते. त्यावेळी तुरुंगात टाकण्याची तंबी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून अनिलअंबानी यांना मिळाली होती. त्यावेळी त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांनी दिली ती रक्कम भरुन परिवाराची लाज राखली होती. आता कुणीही मदत करण्यास तयार नसल्याचे अनिल अंबानी यांनी स्पष्ट केले आहे.