विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील भेटीनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेचे मोहोळ उठले आहे. राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपा युती होण्याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. महाविकास आघाडीची सत्ता तयार करण्याकामी संजय राऊत यांनी महत्वाची भुमीका बजावली होती. शरद पवारांपासून, काँग्रेस नेत्यांना एकत्र आणण्यासह सेनेला मुख्यमंत्रीपदाचा मुकुट लावण्यात संजय राऊत यांनी कामगीरी बजावली. असे असले तरी युती तुटल्यानंतर आता फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीने राजकीय चर्चेला वेग आला आहे.
या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे सांगितले जात असले तरी अंदर की बात बाहेर सांगण्यास कुणी तयार नाही. राजकारणात जे दिसते ते नसते. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांना जळगावात एका कार्यक्रमात पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर एका प्रश्नाला उत्तर देतांना गुलाबराव म्हणाले की राजकारणात कुणी कुणाचा मित्र अथवा शत्रू नसतो. ही केवळ विचारांची लढाई असते. ज्याप्रमाणे आपण विविध कार्यात गेल्यावर एकमेकांना भेटतो त्याप्रमाणे ते दोघे नेते एकमेकांना भेटले.
भाजपा आणि शिवसेना यांचा एकमेकांशी ओढा वाढला की नाही, याबाबत आपण मत मांडू शकत नसल्याचे गुलाबराव म्हणाले. नेत्यांचा आदेश कार्यकर्ते पाळतात. आम्ही आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्यातील भेटीत राजकीय उद्देश नव्हता. सामना या दैनीकाच्या मुलाखतीसाठी त्यांची भेट झाली, हे राऊत यांनी सांगितले आहे. दोन्ही पक्ष वेगवेगळे असले तरी एक नेता दुसऱ्या नेत्याची भेट घेवू शकतो. संजय राऊत हे सामना या वृत्तपत्राचे प्रमुख आहेत. दोघांच्या चर्चेला वेगळं वळण द्यावे असे काही नाही. ते एकमेकांना भेटू शकत नाही का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.