मुंबई : राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ती मार्गदर्शक तत्वे संबंधितांना रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर हे घटक रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. कोरोनाचे संकट मोठे असून, या संकट कालावधीत हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक सरकारसोबत असल्याचे समाधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
कोरोना विषाणूवर लस अथवा औषध अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक जबाबदारीने पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
आतापर्यंत बंद असलेले अनेक व्यवहार हळूहळू सुरु होत आहेत. व्यवहार बंद ठेवणे हा कुणाच्याही आवडीचा विषय असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रुपात राज्य सरकारला मिळणारा महसूल देखील बंद आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम येणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची सरकारला जाणीव आहे. त्यासाठीच मर्यादा पाळून, जबाबदारीचे काळजीपुर्वक भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न सुरु आहे.