मुंबई : मराठा संघटनांकडून उद्या शनिवारी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हा बंद उद्या होणार नाही. हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
मराठा संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत यशस्वी चर्चा झाली असून उद्याचा बंद हा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती आली आहे.
मराठा संघटनांच्या वतीने सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्महक चर्चा झाली असून एक महिन्यांचा अवधी त्यांनी घेतलेला आहे. तसेच एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात देखील सकारात्मक चर्चा झाल्याचे सुरेश पाटील यांनी म्हटले आहे.
महिनाभरात दोन्ही प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्याने उद्याचा बंद मागे घेण्यात आल आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भातील बैठकीचे चर्चासत्र सुरु होते. या बैठकीसाठी विनायक मेटे, छत्रपती संभाजी महाराज आणि सुरेश पाटील या तिघांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.