नागपूर : बलात्कार सिद्धतेसाठी पीडितेच्या शरीरावर आरोपीचे रक्त अथवा वीर्य आढळून येणे आवश्यक नसल्याचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. विनय जोशी यांनी दिले आहे. एका प्रकरणावरील निर्णयात न्या. विनय जोशी यांनी हे मत नोंदवले आहे. हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या परिस्थितीत व पार्श्वभुमीवर हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला.
संबंधित आरोपीच्या वकिलाने पीडित मुलीच्या शरीरावर आरोपीचे रक्त अथवा विर्याचे डाग आढळून आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. त्यामुळे बलात्कार सिद्ध होत नाही असा बचाव घेण्यात आला होता. उच्च न्यायालयाने हा मुद्दा खोडून काढत कायद्यात असे कुठेही नमूद नसल्याचे स्पष्ट केले.
आरोपीने केवळ संभोगाची सुरुवात करणे देखील कायद्याने बलात्कार ठरत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दिनकर त्र्यंबक बुटे (७३) असे आरोपीचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे राहतो. त्याने विस वर्षाच्या मनोरुग्ण व मूकबधिर मुलीवर बलात्कार केला आहे. उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे त्याची दहा वर्षाची सश्रम कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली.
२५ जून २०१९ रोजी सत्र न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती पीडितेसोबत लैंगिक संभोग झाल्याचे आढळून आले. तसेच इतर पुरावे पाहता आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.