उस्मानाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे रा.कॉ. त प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतांना स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आता एक महत्वाचे सुचक विधान केले आहे. एकनाथ खडसे यांना जर राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर, तो त्यांना घ्यावा लागणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
उस्मानाबाद येथील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार यांनी खडसे यांच्या बाबतीत आपली भुमिका स्पष्ट केली.
एकनाथराव खडसे हे विरोधी पक्ष नेते होते. ते राज्याचे अर्थमंत्री देखील होते. एक नेता म्हणून खडसे यांचे योगदान मोठ्या प्रमाणात असून ते आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा तो त्यांनाच पहावा लागणार असल्याचे शरद पवार म्हणाले.
गेल्या 25 वर्षात सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून एकनाथराव खडसे यांची ओळख आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्या कार्याची दखल घेण्यात आली नाही. याबाबत त्यांना दु: ख वाटत असेल. आपल्या कामाची ज्या ठिकाणी नोंद घेतली जाईल तेथे जावे असा ते विचार करत असतील असे शरद पवार बोलतांना म्हणाले.